पंचायत समिती जळीतप्रकरणी संशयित ताब्यात : तीन दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:33 IST2021-08-19T04:33:19+5:302021-08-19T04:33:19+5:30
मागील आठवड्यात शनिवार आणि रविवारी सुटी होती. या कक्षात खिडकीच्या काचा फोडून कक्षात ज्वलनशील पदार्थ ...

पंचायत समिती जळीतप्रकरणी संशयित ताब्यात : तीन दिवसांची पोलीस कोठडी
मागील आठवड्यात शनिवार आणि रविवारी सुटी होती. या कक्षात खिडकीच्या काचा फोडून कक्षात ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली होती. यात हा कक्ष जळून खाक झाला अग्निशमन दलाला ही माहिती मिळताच त्यांनी येऊन ही आग आटोक्यात आणली. या आगीत शासकीय मालमत्तेचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले होते. त्यानंतर तक्रार कोणी द्यायची, हे नाट्य रंगले होते. पोलीस निरीक्षक यशवंत बागुल यांनी गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यांना स्वतः तक्रार देण्यासाठी सांगितले होते, परंतु ते पुढे येत नव्हते. नंतर धस यांनी उद्धव पवार यांच्याविरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर लोकप्रतिनिधी, सरपंच व काही शेतकऱ्यांनी वरिष्ठांना निवेदने दिली. त्यात गटविकास अधिकारी धस यांनीच लाखोंचा भ्रष्टाचार दडपण्यासाठी ही आग लावली असून त्यांनी जाणूनबुजून उद्धव पवार यांच्यावर एकाच आठवड्यात दोन वेळेस खोट्या तक्रारी देऊन गुन्हे दाखल केले, असे नमूद केले होते. वरिष्ठांकडे निवेदने देण्यात आल्याने आणि गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यांच्यावरच संशय घेतला गेल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी धस यांना सक्तीच्या रजेवर पाठविले व चौकशीसाठी चारसदस्यीय समिती नेमली आहे.
दरम्यान, जळालेल्या कक्षात संगणक ऑपरेटर म्हणून काम करणारा कृष्णा आवचार याला मंठा पोलिसांनी १७ ऑगस्ट रोजी रात्री ताब्यात घेऊन चौकशी केली असता, गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यांनी मला शिवीगाळ केल्यामुळे मी रागाच्या भरात ही आग लावली असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर त्याला बुधवारी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. अवचार यास पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, पोलीस उपविभागीय अधिकारी राजू मोरे, पोलीस निरीक्षक यशवंत बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आसमान शिंदेंसह पोलीस उपनिरीक्षक नितीन गट्टुवार, दीपक आढे, प्रशांत काळे, संतोष बनकर, विलास कातकडे, मांगीलाल राठोड, कानबाराव हराळ यांनी ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडली.