पान दोन पट्ट्यातील बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:30 IST2021-01-03T04:30:42+5:302021-01-03T04:30:42+5:30
जाफराबाद : तालुक्यातील डोणगाव परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. यातच गुरुवारी दोन कुत्र्यांनी एका लहान मुलाला चावा घेतला, ...

पान दोन पट्ट्यातील बातम्या
जाफराबाद : तालुक्यातील डोणगाव परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. यातच गुरुवारी दोन कुत्र्यांनी एका लहान मुलाला चावा घेतला, त्यामुळे गाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे दुचाकीमागेही मोकाट कुत्रे लागतात. त्यामुळे अपघाताची भीती नाकारता येत नाही.
‘त्या’ परीक्षेत गुणानुक्रमे आलेल्यांना प्रमाणपत्र
जालना : काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत पात्र ठरलेल्या परीक्षार्थींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील जि.प. मुलांची प्रशाला येथे ५ जानेवारी रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत या प्रमाणपत्रांचे वाटप केले जाणार आहे. पात्र परीक्षार्थींनी आवश्यक ती कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची मागणी
जालना : मागील काही महिन्यांपूर्वी नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातील काही महत्त्वाच्या चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते; परंतु सद्य:स्थितीत अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले असून, सदरील कॅमेरे तातडीने सुरू करण्यात यावेत, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा, या हेतूने जालना शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते.
तलावातील झाडे-झुडपे तोडणार
जालना : नवीन जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी (संत गाडगेबाबा) जलाशय परिसरात काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. ही झाडे-झुडपे तोडण्याबाबतचा ठराव नुकत्याच झालेल्या सभेत घेण्यात आला आहे. जलाशय परिसरात झाडे-झुडपे वाढली असल्याने जलाशयाच्या भिंतीला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमधून झाडे-झुडपे तोडण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती.
पंडित व्ही. वासरे यांची सदस्यपदी नेमणूक
जालना : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी) अंतर्गत कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेच्या अभ्यासमंडळाचे सदस्य म्हणून पंडित व्ही. वासरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. पंडित वासरे सध्या खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा सदस्यपदाचा कार्यकाळ तीन वर्षे राहणार आहे.
हरभरा पिकावर अळी; उत्पादक चिंतेत
जालना : मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल होत असून, या बदलाचा फटका हरभरा पिकाला बसला आहे. सध्या अनेक गावांमध्ये हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातून खरिपातील कपाशी, मका आदी पिके गेली आहेत. आता शेतकऱ्यांची सर्व मदार रबी पिकांवर आहे; परंतु बदलत्या वातावरणाचा या पिकांना फटका बसत आहे.