पान एकचा पट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:41 IST2021-01-08T05:41:44+5:302021-01-08T05:41:44+5:30
जालना : शहरासह परिसरात सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रिमझिम पाऊस झाल्याने वातावरणात गारवा पसरला आहे. बेमोसमी पाऊस होत ...

पान एकचा पट्टा
जालना : शहरासह परिसरात सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रिमझिम पाऊस झाल्याने वातावरणात गारवा पसरला आहे. बेमोसमी पाऊस होत असल्याने सर्दी, ताप, खोकला यासारखे आजार बळावण्याची दाट शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असताना आता पुन्हा दोन दिवसांपासून आकाशात ढगांची गर्दी जमा होत असल्याने शेतकरी पुरते धास्तावले आहे.
भरती तत्काळ करण्याची मागणी
जालना : गेल्या काही महिन्यांपासून स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती प्रकरण महाराष्ट्र शासन गांभीर्याने घेत नसून, परीक्षांच्या तारखांविषयी फक्त चालढकल केली जात आहे. शासनाने स्पर्धा परीक्षांसह पोलीस भरती तत्काळ करावी, अशी मागणी अखिल भारती विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनावर प्रथमेश कुलकर्णी, समाधान कुबेर, रामदास बरसाले, आंदोलन प्रमुख तुषार सैबी, अभिषेक आडेप आदींची नावे नमूद करण्यात आली आहे.
शिक्षकांची पोलीस ठाण्यात धाव
जालना : पात्र असतानाही पंधरा वर्षापासून शाळांचे अनुदान मंजूर न करता, खोटी आश्वासने देऊन, दिरंगाई करणाऱ्या शिक्षणमंत्र्यांसह शिक्षक आमदार, शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त, संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विनाअनुदानित शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात तालुका जालना पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. यावेळी शिक्षक विजय सुरासे, शंकर शेरे, ओम एखंडे, बाळू शिंदे, संदीप इंगोले, प्रताप नागरे, सारिका गायके, अर्पणा लामतुरे आदींची उपस्थिती होती.
धावडा येथील वीजपुरवठा सुरळीत
धावडा : भोकरदन तालुक्यातील धावडा येथील झोपडपट्टी परिसरातील रोहित्राचे गट्टू दोन आठवड्यापासून जळाल्याने परिसरात अंधार होता. त्यामुळे नागरिकांची गैरसोय सुरू होती. मात्र, वीज कर्मचाऱ्यांनी रविवारी नवीन गट्टू बसवून सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत केला आहे. समतानगर भागातील वीज समस्या सोडविण्यासाठी येथील वीज कर्मचाऱ्यांनी शेतातील थ्री फेज रोहित्रावरून वीज जोडणी केली.