पान एकच्या बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:41 IST2021-01-08T05:41:28+5:302021-01-08T05:41:28+5:30
राजूर : येत्या १५ जानेवारीपासून भोकरदन तालुक्यातील बाणेगाव येथील खडेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनीत नाफेड अंतर्गत तूर खरेदी केंद्र ...

पान एकच्या बातम्या
राजूर : येत्या १५ जानेवारीपासून भोकरदन तालुक्यातील बाणेगाव येथील खडेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनीत नाफेड अंतर्गत तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी नावनोंदणी करण्याचे आवाहन कंपनीचे चेअरमन संतुकराव पडोळ यांनी केले आहे. बाणेगाव येथील कंपनीस नाफेड अंतर्गत तूर खरेदी केंद्रास परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या तुरीची शासकीय हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे. तुरीला ६ हजार रुपये क्विंटल हमीभाव ठरवून देण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांनी १५ जानेवारीपर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी तुरीचा पेरा असलेला सातबारा उतारा, बँक पासबुक, आधार कार्डची झेरोक्स प्रत आणून देणे आवश्यक आहे.
अंबड नगर परिषदेने अतिक्रमण काढले
अंबड : नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानालगतच्या शासकीय जागेवर काही लोकांनी अतिक्रमण केले होते. तहसीलदार तथा नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी विद्याचरण कडवकर यांनी नुकतेच हे आतिक्रमण काढले आहे. संबंधित अतिक्रमणधारकास ५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अतिक्रमण हटाव मोहीम तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक गोपाल चौधरी, नगर अभियंता ऋषिकेश जोशी, विद्युत अभियंता प्रवीण शिंदे, संजय देशपांडे, शफीयोद्दीन हस्नोद्दीन, प्रदीपसिंह ठाकूर, भारत जाधव, संतोष खरात, रहेमततुल्ला कद्रतुल्ला यांनी राबविली.
हॉटेलसमोर उभी केलेली दुचाकी लंपास
जालना : जालना शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, हॉटेलसमोर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना अंबड चौफुली परिसरातील बसस्थानक भागात घडली. याप्रकरणी बाबासाहेब तुपे (भिलपुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.