पान एकच्या बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:25 IST2021-01-02T04:25:59+5:302021-01-02T04:25:59+5:30
जालना : तालुक्यातील आंबेवाडी जिल्हा परिषद शाळेत सेवानिवृत्त झालेल्या केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. या ...

पान एकच्या बातम्या
जालना : तालुक्यातील आंबेवाडी जिल्हा परिषद शाळेत सेवानिवृत्त झालेल्या केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी गटशिक्षणाधिकारी गीता नाकाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय जाधव, पी. आर. जाधव यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी विठ्ठल जायभाये, केंद्रप्रमुख शशिकला केतकर, केंद्रीय मुख्याध्यापक म. नईम, म बशीर, मुख्याध्यापिका लता चव्हाण, ज्ञानेश्वर गिराम आदींची उपस्थिती होती.
किन्होळा येथे कृषी प्रशिक्षण
बदनापूर : तालुक्यातील माैजे किन्होळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कृषी विभागामार्फत दोन दिवसीय फळ व भाजीपाला प्रक्रिया प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी तंत्र अधिकारी मनिषा कारले यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे विस्तार शिक्षण डॉ. राहुल कदम, मृदाशास्त्रज्ञ डॉ. आश्विनी बोडखे आदींची उपस्थिती होती.
सरकी घेऊन जाणारा ट्रक उलटला
अंबड : जालना महामार्गावरील अंतरवाला फाट्याजवळ गुरूवारी पहाटे दुभाजकाला धडकून सरकी घेऊन जाणारा ट्रक उलटला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, महामार्गावरील दुभाजकात भराव न टाकण्यासह सूचना फलक न लावल्याने सतत अपघाताच्या घटना घडत आहेत.
दोनशे क्विंटल सोयाबीन लंपास
परतूर : शहरातून धुळे येथे ट्रकद्वारे पाठविलेले दोनशे क्विंटल सोयाबीन लंपास केल्याची तक्रार परतूर पोलिसांत व्यापाऱ्याने दिली आहे. परतूर येथील होलानी ट्रेडिंग कंपनीचे माल तथा परतूर बाजार समितीचे माजी उपसभापती दिनेश होलानी यांना खरेदी केलेला २०० क्विंटल सोयाबीन धुळे येथील एका कंपनीला पाठवायचा होता. त्यासाठी त्यांनी शहरातील रोशन ट्रान्सपोर्टचे नटवर खंडेलवाल यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर सोयाबीन घेऊन ट्रक धुळ्याकडे रवाना झाला. हा ट्रक सोमवारी दुपारपर्यंत धुळे येथे पोहचणे अपेक्षित होता. परंतु, पोहचला नाही.