पान चारचा पट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:28 IST2020-12-22T04:28:58+5:302020-12-22T04:28:58+5:30
वालसावंगी : दिवसा वीज पुरवठा सुरळीत नसल्याने शेतकऱ्यांना रात्री शेतात जागावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले ...

पान चारचा पट्टा
वालसावंगी : दिवसा वीज पुरवठा सुरळीत नसल्याने शेतकऱ्यांना रात्री शेतात जागावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. सध्या मुबलक पाणी असल्याने रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याचे काम शेतकरी करीत आहे. मात्र, दिवसा वीज टिकत नसल्याने पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात मुक्कामी राहावे लागत आहे.
शालेय विद्यार्थ्यांना घरबसल्या धडे
भोकरदन : कोरोनामुळे शाळांचे कुलूप अद्याप उघडलेले नाही. ज्या पालकांकडे मोबाईल नाहीत किंवा साधे मोबाईल आहेत. अशा विद्यार्थांच्या घरी जाऊन भोकरदन तालुक्यातील गोद्री येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दररोज शिकवणी देत आहेत. या उपक्रमाचे पालकांकडून स्वागत होत आहे. यासाठी शिक्षक जी.एस. इंगळे, यु. एम. पालकर, कंकाळ, पैठणकर आदी परिश्रम घेत आहेत.
शहरातील लोखंडी पुलावर वाहतुकीचा फज्जा
जालना : जुना आणि नवीन जालन्याला जोडणारा ब्रिटिशकालीन पूल पाडल्यानंतर तेथे नवीन पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे त्या पुलावरील सर्व वाहतूक छोट्या पुलावरून सुरू आहे. या पुलाची क्षमता एकेरी वाहतुकीची आहे. परंतु, पुलाचा जवळचा मार्ग असल्याने दुचाकीसह तीनचाकी, चारचाकी वाहने या पुलावरूनच ये-जा करीत आहे. त्यामुळे पुलावर वाहतुकीचा फज्जा उडत आहे.
जालना जिल्ह्यात तापमानात घट
जालना : यावर्षीच्या संपूर्ण पावसाळ्यात चांगला आणि दमदार पाऊस झाल्याने यंदा थंडीत वाढ झाली आहे. रविवारी सकाळी १० अंश तर दुपारी १३ अंश तापमान नोंदवले गेले. संपूर्ण आठवड्यातील तापमानापेक्षा रविवारच्या तापमानात मोठी घट झाल्याचे दिसून आले. दिवसभर वातावरणात गारवा असल्याने लोकांनी उबदार कपडे परिधान केले तर अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवून उब घेतली.
जालन्यात बौध्द वधू-वर परिचय मेळावा
जालना : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात येत्या रविवारी बौध्द समाजातील विवाह इच्छुक तरूण- तरूणींसाठी वधू -वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मोफत असणाऱ्या या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. मेळाव्यास पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव, नगरसेवक राहुल हिवाळे, उपनिरीक्षक संजय बनकर, दिलीप खरात, प्रा. एम.एम. तांबे, प्रा. पोटे, डॉ. कविता अंभोरे आदींची उपस्थिती राहणार आहे.
आरएचव्ही समोरील रस्त्याची दुरवस्था
जालना : शहरातील बाबूराव काळे ते जवाहर पोलीस चौकी या दरम्यानच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. रहदारीच्या या रस्त्यावर मोठ-मोठाले खड्डे पडले आहेत. रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनधारक खड्ड्यात पडून जखमी होत आहेत. नगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
अवैध प्रवासी वाहतुकीकडे दुर्लक्ष
भोकरदन : शहरासह परिसरात अवैध प्रवासी वाहतूक जोमात सुरू आहे. अनेक वाहनचालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, वाढलेले अपघात पाहता पोलीस प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
बदनापुरात नाल्या तुंबल्या; आरोग्य धोक्यात
बदनापूर : शहरात नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नाल्यांची साफसफाई करण्यात येत नसल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. तापासह डेंग्यूचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत नगरपंचायतीने शहर स्वच्छतेबरोबरच औषध फवारणी करावी, अशी मागणी केली जात आहे.
परतूर येथे बैठक
परतूर : राज्यातील चर्मकार समाज गेल्या अनेक वर्षांपासून न्याय व हक्कापासून वंचित राहिलेला आहे. या समाजाच्या हक्कासाठी संघटित होऊन लढण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राजू बासनवाल यांनी परतूर येथे आयोजित कार्यक्रमात केले.
शेतकरी नाराज
अंबड : तालुक्यातील माहेर भायगाव व रोहिलागड सर्कलमधील शेतकऱ्यांचा मागील वर्षीचा मोसंबी विमा मंजूर झालेला असताना तो वगळण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाने तत्काळ विम्याची रक्कम द्यावी, अशी मागणी होत आहे.
सुविधांची वानवा
भोकरदन : शहरातील काही वसाहतींमध्ये कोणत्याही नागरी सुविधा नसल्याने येथील रहिवासी भौतिक सुविधांपासून वंचित आहेत. यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मुख्याधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
काटेरी झुडपे वाढली
अंबड : तालुक्यातील सुखापुरी तलावाला काटेरी झुडपांचा व अनावश्यक झाडांचा विळखा पडलेला आहे. तलावाच्या सुरक्षा भिंतीवर काटेरी झुडपे, गवत असल्याने धरणाच्या भिंतीला धोका निर्माण झाला आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
अवैध वाळूचा उपसा
जाफराबाद : तालुक्यातील विविध नदी पात्रातून रात्रीच्या वेळी वाळूचा उपसा केला जात आहे. याकडे पोलीस व महसूल प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.