प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शेतकऱ्याचा मुलगा बनला पीएसआय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:32 IST2021-02-24T04:32:26+5:302021-02-24T04:32:26+5:30
जळगाव सपकाळ : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्द व मेहनतीच्या जोरावर भोकरदन तालुक्यातील हिसोडा बू. येथील एका अल्पभूधारक ...

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शेतकऱ्याचा मुलगा बनला पीएसआय
जळगाव सपकाळ : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्द व मेहनतीच्या जोरावर भोकरदन तालुक्यातील हिसोडा बू. येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा पोलीस उपनिरीक्षक झाला आहे. राजू माणिकराव कोरडे असे त्या तरूणाचे नाव आहे.
येथील माणिकराव कोरडे यांना दोन मुले आहेत. त्यांच्याकडे दीड एकर शेती आहे. शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू असल्याने घरची परिस्थिती नाजूक होती. परंतु, मुलांना शिकवून मोठं साहेब करायचं हा निश्चय त्यांच्या मनात होता. त्यांनी दोन्ही मुलांना लहानपणापासूनच जिवाचे रान करून शिकवले. वडिलांची धडपड पाहून राजू हा रात्रंदिवस मेहनत करून अभ्यास करायचा. २०१२ मध्ये मुंबई पोलीस दलात तो भरती झाला. मात्र, मोठा अधिकारी बनायचं व वडिलांचे नाव मोठे करायचे हे स्वप्न बाळगून त्याने मेहनत केली. जमेल त्या पध्दतीने एमपीएससीचा अभ्यास सुरू केला. कठोर मेहनत व जिद्दीच्या जोरावर राजू कोरडे यांनी एमपीएसच्या परीक्षेत राज्यातून १५६ वा रॅक प्राप्त करत पोलीस उपनिरीक्षक पद मिळविले. या यशाबद्दल त्याचा हिसोडा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याने मिळविलेले हे यश खरच कौतुकास्पद असल्याचे त्याच्या शिक्षकांनी सांगितले.
राजू यांचे प्राथमिक शिक्षण हे हिसोडा येथे झाले तर माध्यमिक शिक्षण हे जळगाव सपकाळ येथे झाले.
कोट
मनात दुर्दम्य इच्छा शक्ती असेल, तर या जगात अशक्य असे काहीच नाही. फक्त मी ते करणारच असा दृढ विश्वास मनात असायला हवा. तरुणांनी यशाच्या दिशेने वाटचाल करायला हवी. कठोर मेहनत व जिद्द मनात बाळगून तरूणांनी यश संपादन करावे. माझ्या यशाचे श्रेय आई, वडील, शिक्षक, पत्नी, भाऊ यांना जाते.
राजू कोरडे, पीएसआय, हिसोडा बू
.