कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:55 IST2021-02-06T04:55:31+5:302021-02-06T04:55:31+5:30
जाफराबाद : सततच्या बदलत्या वातावरणामुळे जाफराबाद व परिसरातील कांदा पिकावर मावा, मर, करपा रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी तालुक्यातील ...

कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव
जाफराबाद : सततच्या बदलत्या वातावरणामुळे जाफराबाद व परिसरातील कांदा पिकावर मावा, मर, करपा रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी तालुक्यातील हजारो हेक्टरवरील कांदा पीक धोक्यात आले असून, शेतकरी महागडी औषधे फवारणी करीत आहेत. परंतु, उत्पादन खर्चही हाती पडेल की नाही, याची चिंता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
जाफराबाद तालुक्यात नगदी पीक आणि अधिकचा आर्थिक फायदा होईल म्हणून सिड्स बियाणे कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यावर्षी हजारो एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या पोळ कांद्याला करपा आणि मावा या रोगाने ग्रासले आहे. परतीच्या पावसाच्या संकटातून सावरत काही शेतकऱ्यांनी उशिराने कांदा पिकाची लागवड केली, तर काहींनी उपलब्ध होईल तेथून मिळेल त्या भावात कांदा विकत घेऊन हजारो हेक्टर क्षेत्रात लागवड केली. यासाठी एकरी सुमारे ५० हजारांहून जास्त खर्च आला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल होत असून, पहाटेच्या वेळेस दाट धुके व दवबिंदू पडत आहे, तर दिवसभर ढगाळ वातावरण राहत असल्याने कांदा पिकावर मर, मावा व करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. लागवड केलेला कांदा गोंडे टाकणे सुरू झालेली असतानाच वातावरणात बदल झाला आणि कांदा पिवळा पडू लागला. तसेच वाढही खुंटली आहे. महागड्या औषधांची फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
कोट
वातावरणातील सततच्या बदलामुळे कांदा पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकरी महागडी औषधे फवारणी करीत आहेत. मात्र, रोगराई नियंत्रणात येत नसल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
सदाशिव गाडेकर, खामखेडा
फोटो