मानेगाव आरोग्य केंद्रात मुदतबाह्य औषधीसाठा
By Admin | Updated: May 7, 2015 00:56 IST2015-05-07T00:47:02+5:302015-05-07T00:56:56+5:30
जालना : मानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर हजर राहत नसल्याने ग्रामस्थांनी कुलूप ठोकल्याचे वृत्त ‘लोकमत’ च्या हॅलो जालनामधून प्रकाशित होताच

मानेगाव आरोग्य केंद्रात मुदतबाह्य औषधीसाठा
जालना : मानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर हजर राहत नसल्याने ग्रामस्थांनी कुलूप ठोकल्याचे वृत्त ‘लोकमत’ च्या हॅलो जालनामधून प्रकाशित होताच बुधवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचे पथक तातडीने गावात पोहोचले. या केंद्राची तपासणी करून पंचनामा केला असता त्यात मुदतबाह्य औषधीसाठा आढळून आला. या धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली आहे. दरम्यान, रविवारी (दि. ३) केंद्र पूर्णपणे बंद असल्याचेही या पथकास निष्पन्न झाले.
आज सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही.एम भटकर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांचे पथक मानेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर दाखल झाले.
ग्रामस्थ व अ.भा. मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी तत्पूर्वीच केंद्रास लावलेले कुलूप काढले होते. या पथकाने भेट दिली तेव्हा, सरपंच अनिल धनेश, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, माजी सभापती रमेश जाधव, अॅड. सोपान शेजूळ, संतोष ढेंगळे, श्रीकिशन कळकुंबे, नितीन भोकरे, राजाभाऊ ढेंगळे आदी उपस्थित होते.
रविवारी केंद्रातीलच एका कर्मचाऱ्याच्या घरी लग्न असल्याने केंद्रातील सर्व कर्मचारी तेथे गेल्याचे व त्या दिवशी वैद्यकीय अधिकारी बाहेरगावी असल्याचे पथकातील अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीतून स्पष्ट झाले.
त्यापाठोपाठ या अधिकाऱ्यांनी केंद्रातील औषधीसाठ्याची तपासणी केली असता, मुदतबाह्य झालेले २५ सलाईन तेथे आढळले. (प्रतिनिधी)
४यावेळी अरविंंद देशमुख यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे यंत्रणेवर नियंत्रण नसल्याचा आरोप केला. तसेच या आरोग्य केंद्रातील समस्येविषयी अधिकाऱ्यांकडे यापूर्वीच तक्रारी करण्यात आल्या. परंतु त्याची दखल घेतली नसल्याचेही म्हटले.
४केंद्रात अस्वच्छता, शौचालयातील दुर्गंधी, अपूर्ण सेवापुस्तिका आढळून आल्याने या पथकाने केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. केंद्रातील रेकॉर्ड ताब्यात घेण्यात आले. याबाबतचा तपासणी अहवाल लवकरच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविला जाणार असल्याचे पथकप्रमुख तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.