शेततळ्यात मत्स्यपालनाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:07 IST2021-07-13T04:07:21+5:302021-07-13T04:07:21+5:30
जालना : मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी शेततळ्यातील मत्स्यपालन करावे, असे आवाहन जिल्ह्याचे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय सुनील वंजारी यांनी केले. खरपुडी येथील ...

शेततळ्यात मत्स्यपालनाची संधी
जालना : मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी शेततळ्यातील मत्स्यपालन करावे, असे आवाहन जिल्ह्याचे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय सुनील वंजारी यांनी केले.
खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्र व मत्स्यव्यवसाय विभागाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मत्स्य किसान दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन चर्चासत्रात ते बोलत होते. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने, अकोला जिल्ह्यातील प्रगतशील मत्स्य व्यावसायिक शेतकरी विठ्ठलराव माळी, वरुडी येथील जयकिशन शिंदे, नंदापूरचे ज्ञानेश्वर उबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेततळी निर्माण झाली आहेत. यापैकी ज्या शेततळ्यात वर्षभर पाणी उपलब्ध असते अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी रोहू, कटला, मृगळ व सायप्रनस या जातीच्या माशांची मिश्र शेती करावी. माशांना लागणारे खाद्य, बाजार व्यवस्थापन याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
भारताचे मत्स्य उत्पादनात जगात तिसऱ्या क्रमांकावर असून, जगाच्या १० टक्के मासे उत्पादन एकट्या भारतात होतात. महाराष्ट्रात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनास संधी असून, शेततळी धारक शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन डॉ. सोनुने यांनी प्रास्ताविकात केले. यावेळी शेतकरी विठ्ठलराव माळी, जयकिशन शिंदे, ज्ञानेश्वर उबाळे यांनीही आपले अनुभव सांगितले. पशुवैद्यक तज्ज्ञ डॉ. एच. एम. आगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.