खासगी ट्रॅव्हल्समध्ये मोकळे रान; ना सॅनिटायझर, ना सोशल डिस्टन्सिंग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:28 IST2021-05-17T04:28:51+5:302021-05-17T04:28:51+5:30
जालना : कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लागू केले असले तरी खासगी ट्रॅव्हल्स मालकांकडून या नियमांना तिलांजली ...

खासगी ट्रॅव्हल्समध्ये मोकळे रान; ना सॅनिटायझर, ना सोशल डिस्टन्सिंग !
जालना : कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लागू केले असले तरी खासगी ट्रॅव्हल्स मालकांकडून या नियमांना तिलांजली दिली जात असल्याचे लोकमतने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये उघड झाले आहे.
जिल्ह्यात कोरोनाअगोदर दररोज ४० ते ४५ खासगी ट्रॅव्हल्स ये-जा करत होत्या. रोज जवळपास दीड ते दोन हजार प्रवासी पुणे, मुंबई, नागपूर यासह इतर शहरांमध्ये प्रवास करीत होते. परंतु, मागील वर्षभरापासून देशासह राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातल्याने खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यातच आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत. खासगी ट्रॅव्हल्सला प्रवासी ने-आण करण्यासाठी मुभा दिली असली तरी त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खासगी ट्रॅव्हल्समध्ये नियमांचे पालन होते की नाही, याबाबत आमच्या प्रतिनिधींनी रिॲलिटी चेक केला असता, यात धक्कादायक बाब समाेर आली. जालना शहरातील बसस्थानक भागातून मोठ्या प्रमाणात खासगी ट्रॅव्हल्स सुटतात. येथे शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पाहणी केली असता, बहुतांश प्रवासी विनामास्क होते, तर ट्रॅव्हल्समध्ये सॅनिटायझरची व्यवस्थादेखील करण्यात आली नसल्याचे दिसून आले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.
ना मास्क, ना सॅनिटायझर
सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खासगी ट्रॅव्हल्समधून कमी प्रवासी प्रवास करीत असले तरी शासनाने नियमांचे पालन करण्याच्या सूचना ट्रॅव्हल्स मालकांना दिल्या आहेत. परंतु, ट्रॅव्हल्स मालकांकडून या नियमांना तिलांजली दाखविली जात आहे. ट्रॅव्हल्समधून प्रवास करणारे बहुतांश प्रवासी विनामास्क असल्याचे दिसून आले. शिवाय, सॅनिटायझरची व्यवस्थाही नसल्याचे पाहायला मिळाले.
ट्रॅव्हल्सवर कारवाई नाही
खासगी ट्रॅव्हल्स मालकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असतानाही पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली नाही. याबाबत वाहतूक शाखेचे सपोनि. नाडे म्हणाले की, सध्या एकही ट्रॅव्हल्स सुरू नाही, त्यामुळे कारवाई केली नसल्याचे त्यांनी सांगितले.
ई-पास कोणाकडेही नाही
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परजिल्ह्यात प्रवास करायचा असले तर ई-पासची अट शासनाने ठेवली आहे. परंतु, खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांना ई-पासची सक्ती करण्यात आलेली नाही. एका ट्रॅव्हल्स मालकाला विचारले असता, ते म्हणाले की, ई-पासची गरज नाही.