जनगणना झाली तरच आर्थिक नियोजनात अठरापगड जातींना वाटा मिळेल : चोथे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:28 IST2021-01-18T04:28:16+5:302021-01-18T04:28:16+5:30
अंबड : ओबीसीची जनगणना झाली तरच देशाच्या आर्थिक नियोजनात अठरापगड जातींना वाटा मिळेल. कुठल्याही समाजावर अन्याय होऊ न देता ...

जनगणना झाली तरच आर्थिक नियोजनात अठरापगड जातींना वाटा मिळेल : चोथे
अंबड : ओबीसीची जनगणना झाली तरच देशाच्या आर्थिक नियोजनात अठरापगड जातींना वाटा मिळेल. कुठल्याही समाजावर अन्याय होऊ न देता ओबीसी समाजाची ताकद वाढविली पाहिजे. विविध मागण्यांसाठी २४ जानेवारी रोजी जालना येथे मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी आमदार शिवाजी चोथे यांनी केले.
अंबड येथील पंडित गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात रविवारी ओबीसी परिषद व माजी आमदार राजेश राठोड यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार नारायण मुंडे यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार राजेश राठोड यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना चोथे म्हणाले की, ओबीसी आरक्षण अबाधित ठेवणे ही शिवसेनेची भूमिका आहे. लोकप्रतिनिधी हे सर्व समाजाचे असून, त्यांच्यासाठी सर्व समाजाचे प्रश्न महत्त्वाचे असतात. मराठा व ओबीसीमध्ये द्वेष पसरवणे चुकीचे आहे. ओबीसी समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी २४ जानेवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. कुठेही गालबोट लागू न देता कोणाबद्दल अपशब्दही न बोलता मोर्चा निघाला पाहिजे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय काळबांडे यांनी केले. याप्रसंगी आमदार राजेश राठोड म्हणाले की, ओबीसींचा आवाज म्हणून सभागृहांमध्ये आपण प्रश्न मांडणार आहे. ओबीसी समाज हा अन्याय सहन करणारा असून, राजकीय भविष्य अबाधित ठेवायचे असेल तर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक प्रश्नांसाठी एकत्र येणे गरजेचे आहे. केंद्र सरकारला याची दखल घेण्यासाठी लाखोंच्या समुदायाने ओबीसी समाज जालना येथील मोर्चात सहभागी होईल, असे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यानंतर नारायण मुंडे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन देवकर यांनी, तर आभार डॉ. रमेश तारगे यांनी मानले. यावेळी समाजाबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.