केवळ ५० टक्के नागरिकांनी घेतला पहिला डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:36 IST2021-09-07T04:36:10+5:302021-09-07T04:36:10+5:30
देऊळगाव राजा : देऊळगाव राजा तालुक्याला १ लाख ८ हजार ७२६ नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी केवळ ...

केवळ ५० टक्के नागरिकांनी घेतला पहिला डोस
देऊळगाव राजा : देऊळगाव राजा तालुक्याला १ लाख ८ हजार ७२६ नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी केवळ ५४३८३ जणांनी पहिला तर ३८ हजार २५३ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून धुमाकूळ घातलेल्या कोरोनाची रुग्णसंख्या मागील काही दिवसांपासून घटली आहे. असे असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका असून, प्रशासनाच्या वतीने उपाययोजना केल्या जात आहेत. शिवाय, जास्तीत-जास्त नागरिकांनी लसीकरण करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. त्यानुसार देऊळगाव राजा तालुक्यात आजपर्यंत ५४३८३ जणांनी पहिला तर ३८ हजार २५३ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. तालुक्यात ११३७ आरोग्य कर्मचारी असून, ९९८ कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. फ्रंटलाईन वर्करची संख्या १९८० असून, १९४९ वर्करचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. १८ ते ४४ वयोगटातील ६१८४८ जण असून, त्यापैकी १५४८९ लोकांनी पहिला डोस घेतला आहे. ४५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील ४३७६१ जण असून, त्यापैकी १९८१७ लोकांनी पहिला डोस घेतला आहे.
जास्तीत-जास्त नागरिकांनी लसीकरण करावे, यासाठी ग्रामीण रुग्णालय दे.राजा व दे. मही, प्राथमिक आरोग्य केंद्र अंढेरा व जवळखेड अंतर्गत दररोज ५ ते ६ लसीकरण शिबीर घेण्यात येत आहे. तसेच आजपर्यंत जवळपास ४९ गावांमध्ये लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी दत्ता मांटे यांनी दिली.
जास्तीत-जास्त नागरिकांनी लसीकरण करावे
कोरोनाला रोखण्यासाठी तालुक्यात उपाययोजना केल्या जात आहेत. शिवाय लसीकरणाची गती देखील वाढविण्यात आली आहे. प्रत्येक गावात लसीकरण शिबिर घेण्यात येत आहे. तालुक्यातील ५० टक्के नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. उर्वरित नागरिकांनीही लसीकरण करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले.