तीन महिन्यांपासून एक लाख ६४ हजार निराधारांना अनुदानाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:01 IST2021-02-05T08:01:20+5:302021-02-05T08:01:20+5:30

जालना : निराधार नागरिकांना देण्यात येणारे अनुदान मागील तीन महिन्यांपासून मिळाले नाही. त्यामुळे एक लाख ६४ हजार ८८२ ...

One lakh 64 thousand destitute waiting for grant for three months | तीन महिन्यांपासून एक लाख ६४ हजार निराधारांना अनुदानाची प्रतीक्षा

तीन महिन्यांपासून एक लाख ६४ हजार निराधारांना अनुदानाची प्रतीक्षा

जालना : निराधार नागरिकांना देण्यात येणारे अनुदान मागील तीन महिन्यांपासून मिळाले नाही. त्यामुळे एक लाख ६४ हजार ८८२ निराधार नागरिक व त्यांचे कुटुंबीय आर्थिक अडचणीत आले आहे. अनुदान तत्काळ खात्यांमध्ये जमा करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

निराधार नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे, यासाठी शासनाकडून निराधार नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. निराधार व्यक्ती पूर्णपणे दुसऱ्यांच्या भरवशावर जगत असल्याने योजनांचा लाभ देण्याबरोबरच त्यांना आर्थिक मदतही करणे आवश्यक आहे. जेणे करून त्या पैशाचा उपयोग औषधी खरेदी करण्याबरोबरच दैनंदिन गरजांवर करता येतो. निराधारांना अनुदान देण्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजना चालविल्या जातात. या योजनांतर्गतच्या लाभार्थ्याला ६०० रुपये मासिक अनुदान दिले जाते. मात्र, मागील तीन महिन्यांपासून मानधनच मिळाले नाही. ऑक्टोबर महिन्यानंतर मानधन मिळणे बंद झाले आहे. मानधनाची रक्कम सरळ बँक खात्यात जमा होत असल्याने निराधार नागरिक सर्व प्रथम बँकेमध्ये जाऊन अनुदानाविषयी विचारणा करता, तेव्हा त्यांना अनुदान जमा नसल्याचे सांगण्यात येते. सतत तीन महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने निराधार नागरिक व त्यांच्या कुटुंबीय आर्थिक अडचणीत आले आहेत. तत्काळ मानधन देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

शासनाकडे अनुदानाची मागणी

शासनाकडून अनुदान प्राप्त न झाल्याने लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा केले नाही. तिन्ही महिन्यांच्या अनुदानाची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. शासनाकडे तब्बल ११ कोटींची मागणी करण्यात आली आहे. लवकरच अनुदान प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडून अनुदान प्राप्त होताच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा केले जाईल.

राजीव शिंदे, तहसीलदार,

योजनानिहाय लाभार्थी

योजनेचे नाव लाभार्थी संख्या

संजय गांधी निराधार अनुदान योजना २९६५३

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ८३९२६

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना ४९४८४

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना १४५९

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना ३६०

Web Title: One lakh 64 thousand destitute waiting for grant for three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.