ट्रक अपघातात एकाचा मृत्यू, दोघे गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:46 IST2021-02-23T04:46:49+5:302021-02-23T04:46:49+5:30
केदारखेडा : केदारखेडा - नवेगाव मार्गाच्या दरम्यान असलेल्या पुलावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने एक ट्रक पुलाखाली गेला. ट्रकमधील सळ्या ...

ट्रक अपघातात एकाचा मृत्यू, दोघे गंभीर
केदारखेडा : केदारखेडा - नवेगाव मार्गाच्या दरम्यान असलेल्या पुलावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने एक ट्रक पुलाखाली गेला. ट्रकमधील सळ्या केबिनमध्ये घुसल्याने एकाचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर ट्रकमधील सळ्या चालकाच्या केबिनमध्ये घुसल्या होत्या. त्यामुळे मृतासह जखमींना बाहेर काढण्यासाठी जेसीबीद्वारे ट्रकचे दरवाजे तोडावे लागले.
दिनेश बडोले (वय २५, रा. वडवाणी, ता. सेंधवा) असे मृताचे नाव आहे, तर महेश गंगाराम जलवाण्या (३५, ता. अजेड), निषील नयन सोंळुके (१७, रा. ता. राजपूर) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. जालना - भोकरदन मार्गावरील केदारखेडा गावाजवळ वीस वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या या पुलाला संरक्षक कठडे नाहीत. शिवाय सूचना फलक, दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे अपघाताची संख्या वाढली आहे. याच ठिकाणी शनिवारी रात्रीच्या सुमारास जालना येथून सळ्या भरून मध्यप्रदेशकडे जाणारा ट्रक (एमएच १८ एए ९२९६) खड्ड्यांमुळे चालकाचे नियंत्रण सुटून पुलाखाली गेला. अपघातानंतर सळ्या चालकाच्या केबिनमध्ये घुसल्याने ट्रकमधील तिघांना जेसीबी यंत्राने ट्रकचे दरवाजे तोडून बाहेर काढावे लागले. यासाठी भोकरदन पोलीस केदारखेडा येथील बाबासाहेब वराडे, रुस्तुम सहाने, गंगाधर मखरे, प्रवीण जाधव, वाल्मीक पिंपळे, कृष्णा खरात, आदींनी प्रयत्न केले. या प्रयत्नांमुळे गंभीर जखमी दोघांचे प्राण वाचले आहेत. दिनेश बडोले (२५, रा. वडवाणी, ता. सेंधवा) यांचा जागीच मृत्यू झाला. महेश गंगाराम जलवाण्या (३५, ता. अजेड), निषील नयन सोंळुके (१७, रा. ता. राजपूर) हे दोघे गंभीर जखमी झाले आहे. या अपघाताची नोंद भोकरदन पोलीस ठाण्यात झाली असून, बीट जमादार सुरडकर हे तपास करीत आहेत. दरम्यान, पुलाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी डी. एन. कोल्हे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पुलाला संरक्षक कठडे बसविण्यासह खड्डे बुजविण्याचे काम केले जाईल असे त्यांनी सांगितले.
यापूर्वी तिघांचे वाचले प्राण
केदारखेडाजवळील धोकादायक पुलावर गत काही महिन्यांत तीन अपघात झाले आहेत. एक ट्रक, एक दुचाकी, एक टेम्पो खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात पुलाखाली गेले. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही. परंतु, वाहनचालक जखमी झाले असून, संबंधित वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे.
फोटो ओळी- पुलाखाली गेलेला सळ्यांचा ट्रक व अस्ताव्यस्त पडलेल्या सळ्या, पुलाच्या रस्त्यावर असलेले खड्डे, पुलाच्या दोन्ही बाजुने कठड्यांऐवजी असलेली काटेरी झुडपे दिसत आहेत.