जागेच्या वादातून एकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:57 IST2021-02-21T04:57:45+5:302021-02-21T04:57:45+5:30
चौघांची एकास मारहाण जालना : तू शिवजयंतीचे फोटो व्हॉट्स ॲप ग्रुपवर का टाकले नाही, असे म्हणून चौघांनी एकास मारहाण ...

जागेच्या वादातून एकास मारहाण
चौघांची एकास मारहाण
जालना : तू शिवजयंतीचे फोटो व्हॉट्स ॲप ग्रुपवर का टाकले नाही, असे म्हणून चौघांनी एकास मारहाण केल्याची घटना सुखापुरी येथे शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी संतोष संपत बारगे यांच्या फिर्यादीवरून किशोर बबन कांबळे, रवी बबन कांबळे, अनिल बबन कांबळे, भगवान कांबळे (रा. लखमापुरी ता. अंबड) यांच्याविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
एकास मारहाण करून इलेक्ट्रिक वायर चोरली
जालना : ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील वायर चोरून नेल्याची घटना बदनापूर तालुक्यातील खादगाव येथे शनिवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी नामदेव हरिभाऊ ताडगे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी योगेश नभाजी घोरपडे (रा. खादगाव, ता. बदनापूर) याच्याविरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ वाघमारे हे करीत आहेत.
किरकोळ कारणावरून एकास मारहाण
जालना : हरभरा पिकातून हार्वेस्टर मशीन का नेले असे म्हणून चौघांनी मारहाण केल्याची घटना जाफराबाद तालुक्यातील आढा येथे १५ फेब्रुवारी रोजी घडली. याप्रकरणी शनिवारी परमेश्वर सौर यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शेषराव महादू सौर, समाधान शेषराव सौर, संतोष शेषराव सौर व एक महिला (आढा, ता. जाफराबाद) यांच्याविरुद्ध जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोउपनि. सहाणे हे करीत आहेत.
नायगाव येथील किराणा दुकानाला आग
मंठा : नायगाव येथील देवराव गोविंदराव घुगे यांच्या घरासह किराणा दुकानाला १९ फेब्रुवारीच्या रात्री अचानक आग लागून किराणा सामानासह जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. घुगे कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. घराला आग लागल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तोपर्यंत सर्व सामान जळून खाक झाले होते. यात त्यांचे ३ ते ४ लाख रूपयांचे नुकसान झाले. तलाठी श्रीकांत गादेवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
कलावंतांचा उपोषणाचा इशारा
तीर्थपुरी : वृद्ध कलावंतांच्या प्रलंबित मागण्या त्वरित मान्य कराव्यात, नसता जिल्हा परिषद कार्यालयासमोर २ मार्चपासून उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. वृद्ध कलावंतांना तातडीने मानधन देण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार असल्याचे कलावंत राम घोडके, सुधाकर डहाळे, ज्ञानेश्वर जगताप, नाथा शिंदे, नारायण वाघमारे, कासाबाई शिंदे, मेघनाथ शहाणे, भागवत गायकवाड आदींनी सांगितले.