तुरीची आवक घटल्याने तेल बाजारात तेजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:59 IST2021-02-05T07:59:52+5:302021-02-05T07:59:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : दिनांक १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय बजेट सादर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत मागील काही ...

तुरीची आवक घटल्याने तेल बाजारात तेजी
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दिनांक १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय बजेट सादर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत मागील काही दिवसांपासून मंदीचे वातावरण दिसून येत आहे. मात्र, तेल बाजारात मोठी तेजी पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर तुरीची आवक घटल्याने भावात तेजी आली आहे. दरम्यान, तेल बाजारात आयात शुल्क वाढविण्याविषयी सोमवारी मंत्रिमंडळात निर्णय होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
कोरोनामुळे मागील काही महिन्यांत बाजारपेठेत मंदी आल्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारच्या बजेटकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सध्या जालना बाजारपेठेत तुरीची आवक घटली असून, यामुळे १०० ते २०० रुपये प्रतिक्विंटलची तेजी आली आहे. विदर्भातील अमरावती व जळगाव याठिकाणी खरेदी अधिक प्रमाणात झाली आहे. कर्नाटक परिसरातील तुरीचा माल खराब झाल्याने येथील आवक जवळपास बंद झाली आहे. जालना बाजारपेठेत ५ हजार क्विंटलची सरासरी आवक होत असून, भाव ५,६०० ते ६,३००च्या दरम्यान आहेत.
केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यासाठी साखरेचा कोटा १७ लाख टनांचा जाहीर केला असून, हा कोटा कमी असल्यामुळे साखरेमध्ये क्विंटलमागे ३० ते ४० रुपये वाढले आहेत. सध्या साखरेचा भाव ३,२५० ते ३,४०० या दरम्यान आहे. नवीन हरभऱ्याचा जालना बाजारपेठेत श्रीगणेशा झाला आहे. नवीन हरभऱ्याची आवक ५० पोत्यांची आहे तर भाव ४,३०० रुपये प्रतिक्विंटल आहे. महाराष्ट्रासह मध्यप्रदेशमध्ये हरभऱ्याची आवक धीम्यागतीने वाढण्याची चिन्हे आहेत. जालना बाजारपेठेत जुन्या हरभऱ्याची आवकही सध्या सुरू असून, १०० क्विंटल प्रतिदिन आवक सध्या बाजारात होत आहे. याला ३,२००पासून ४ हजारांपर्यंत भाव मिळत आहे. मक्याची आवक ८०० क्विंटलची असून, ५० रुपयांच्या मंदीनंतर भाव १,१०० ते १,३०० च्या दरम्यान आहेत. सोयाबीनची दैनंदिन आवक ३०० क्विंटलची होत असून, यामध्ये १०० रुपये प्रतिक्विंटल वाढ दिसून येत आहे. भाव ४,३०० ते ४,४०० या दरम्यान आहेत.
दरम्यान, कृषी मंत्रालयाने खाद्य तेलांसाठी राष्ट्रीय अभियानांतर्गत १९ हजार करोड रुपयांची मागणी केल्याचे वृत्त असून, त्यामुळे बाजारपेठेत तेलांच्या आयात शुल्कामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने, तेल बाजारात चढ-उतार पाहावयास मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात तेलाच्या किमती २०० रुपये क्विंटलमागे वाढल्या आहेत. सोयाबीन तेल ११,७०० रुपये, सरकी तेल ११,५००, पामतेल ११,२०० रुपये प्रतिक्विंटल भाव सध्या बाजारात आहे.
अन्नधान्याचे बाजारभाव
गहू १,६५० ते २,२५० प्रतिक्विंटल
ज्वारी १,४०० ते २,७०० प्रतिक्विंटल
बाजरी १,१२५ ते १,३५० प्रतिक्विंटल
मूग ४,००० ते ६,५०० प्रतिक्विंटल
उडीद ३,५०० ते ६,५०० प्रतिक्विंटल
गूळ २,५०० ते ३,१०० प्रतिक्विंटल
हरभरा डाळ ५,१०० ते ५,३०० प्रतिक्विंटल
तूरडाळ ८,५०० ते ९,५०० प्रतिक्विंटल
उडीद डाळ ९,५०० ते १०,००० प्रतिक्विंटल
शेंगदाणे ९,००० ते १०,००० प्रतिक्विंटल
साबुदाणा ४,००० ते ४,७०० प्रतिक्विंटल