अधिकारी, कर्मचा-यांतील वादाने तहसीलची अब्रू टांगली वेशीला..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:44 IST2018-03-02T00:43:59+5:302018-03-02T00:44:02+5:30
तहसील कार्यालयात अनेक महिन्यांपासून अधिकारी व कर्मचा-यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा शेवट अखेर गंभीर वळणावर शेवट झाला.

अधिकारी, कर्मचा-यांतील वादाने तहसीलची अब्रू टांगली वेशीला..!
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : तहसील कार्यालयात अनेक महिन्यांपासून अधिकारी व कर्मचा-यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा शेवट अखेर गंभीर वळणावर शेवट झाला. परस्परविरोधी गुन्हे दाखल झाल्यामुळे तालुक्यातील गोर गरीब जनतेच्या न्याय निवाड्याचे काम करणा-या या तहसील कार्यालयाची या प्रकरणामुळे अक्षरश: अब्रूच वेशीला टांगल्याचा आल्याचा प्रकार घडला आहे़
भोकरदन तहसील कार्यालयात योगिता कोल्हे यांनी पदभार घेतल्यानंतर त्यांनी कार्यालयातील कामकाजात बदल करून कामचुकार कर्मचारी व अधिका-याना समज दिली होती. साहजिकच कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांना हा प्रकार रूचला नाही . त्यामुळे आपसात धुसफूस सुरूच होती. अधिकारी व कर्मचारी एकमेकाला कोंडीत पकडण्याचे काम करीत होते. बुधवारी घडलेल्या घटनेने हे अधोरेखित झाले आहे. नायब तहसीलदाराच्या चेंबरमध्ये बुधवारी झालेल्या गोंधळामुळे तहसीलची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे. तलाठी व कर्मचा-यांनी नायब तहसीलदारांना चोप दिला.
वास्तविक तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्यात हा वाद नव्हता. मात्र, अधिका-यांना खुश करण्यासाठी काहींनी पुढाकार घेतला व प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचले. कार्यालयातील प्रत्येक कर्मचारी एकमेकाकडे संशयाने पाहू लागला आहे.
तहसील कार्यालयातील कालचा प्रकार हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये आला आहे. मात्र, यानंतर सीसीटीव्ही बॉक्स गायब झाला आहे. तो कोणी नेला व कशामुळे नेला याचा तपास पोलिसांना लावावा लागणार आहे. शिवाय हा बॉक्स गायब झाल्याची अद्याप तहसीलदारांनी तक्रारही केलेली नाही. त्यामागचे कारण काय याबाबत पोलीस निरीक्षकांनी तहसीलदारांना पत्र दिल्याची चर्चा आहे़ तर गुरुवारी सकाळी पोलीस उपनिरीक्षक वैशाली पवार व त्याचे कर्मचारी कार्यालयात पंचनामा करण्यासाठी गेले असता त्यांना कोणीच कर्मचारी मिळाला नाही. तहसिल कार्यालयात शुकशुकाट होता.