कापूस खरेदी केंद्रावर वाहनधारक शेतकऱ्यांची अडवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:21 IST2021-01-01T04:21:05+5:302021-01-01T04:21:05+5:30
बैलगाड्यांना प्राधान्य : शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूर येथे सुरू असलेल्या सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर दिवसभरात ...

कापूस खरेदी केंद्रावर वाहनधारक शेतकऱ्यांची अडवणूक
बैलगाड्यांना प्राधान्य : शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात
राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूर येथे सुरू असलेल्या सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर दिवसभरात पाचशे क्विंटल पर्यंत कापसाची खरेदी करण्यात येत आहे. यात बैलगाड्यांना प्राधान्य दिले जात असल्याने वाहनधारक शेतकऱ्यांना अनेक दिवस ताटकळत थांबावे लागत आहे. यात वाहनांच्या भाड्याचा शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
राजूर येथील कापूस खरेदी केंद्र १७ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. यानंतर १६ डिसेंबर रोजी कापूस साठवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने कारण सांगून कापसाची खरेदी बंद करण्यात आली होती. याचा शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे २८ डिसेंबर रोजी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेऊन कापूस खरेदी पूर्ववत सुरू करण्यात आली. परंतु, खरेदी केंद्रावर सीसीआयचे अधिकारी मनमानी कारभार करीत असल्याचे दिसून येत आहे. दिवसभरात पाचशे क्विंटल कापूस खरेदी केला जात आहे. यात बैलगाड्यांना प्राधान्य असल्याने ट्रॅक्टर, टेम्पो वाहनातून आणलेल्या कापसाची खरेदी रखडून पडत आहे. बहुतांशी शेतकऱ्यांनी किरायाने वाहने आणली आहेत. यातच दहा ते बारा दिवस मोजमाप होत नसल्याने शेतकऱ्यांना किरायाच्या वाहनांचा मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे. असे असतानाही खरेदी केंद्रावर उशिरा कापूस खरेदी केली जात असून, सायंकाळी लवकर खरेदी बंद करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सीसीआय जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बुधवारपर्यंत केंद्रावर २०७ वाहनांची नोंद झालेली असून, खरेदी केंद्राच्या आवारात मोठ्या प्रमाणात वाहने उभी आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सीसीआयने दिवसभरात कापसाची खरेदी वाढवण्यासह गती द्यावी, अन्यथा येत्या काही दिवसांमध्ये आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. निवेदनावर शिवाजी ढाकणे, रामेश्वर नागवे, विलास मीसाळ, गोरख मोरवळे, ऋषिंदर बनकर, दत्ता काफरे, आत्माराम नागवे, शिवाजी सहाने, नानासाहेब ढाकणे, देविदास नागवे, विठ्ठल शेजुळ, आण्णा ढाकणे, समाधान ढाकणे, दत्तू बकाल, सिद्धेश्वर मोरे, लक्ष्मण कढवणे, दौलतराव नागवे यांच्यासह ४५ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.