कापूस खरेदी करताना शेतकऱ्यांची अडवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:26 IST2021-01-02T04:26:06+5:302021-01-02T04:26:06+5:30
राणी उंचेगाव परिसरातील सामान्य शेतकरी व्यापाऱ्यांच्या लुटीतून वाचण्यासाठी सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर कापसाची विक्री करीत आहेत. यात घनसावंगी कृषी ...

कापूस खरेदी करताना शेतकऱ्यांची अडवणूक
राणी उंचेगाव परिसरातील सामान्य शेतकरी व्यापाऱ्यांच्या लुटीतून वाचण्यासाठी सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर कापसाची विक्री करीत आहेत. यात घनसावंगी कृषी उत्पन्न बाजार समितीने आठवड्यामधील केवळ बुधवारी या एकाच दिवशी बैलगाड्यांमधील कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बुधवारी या केंद्रावर १६० बैलगाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी कृउबा समितीचे नियोजन कोलमडले असल्याचे दिसून आले. बुधवारी आलेल्या बैलगाड्या गुरुवारी दुपारपर्यंतदेखील खाली झाल्या नव्हत्या. तर काही शेतकऱ्यांना टोकनदेखील मिळालेले नव्हते.
शेतकऱ्यांनी बैलगाड्यांमधून आणलेल्या कापूस तपासणीमध्ये सीसीआयकडून अडवणूक केली जाते. केंद्रावर आलेल्या अनेक बैलगाड्यांमधील कापूस अर्धाच खाली करून घेण्यात आला होता. उर्वरित कापूस परत पाठवण्यात आला. शेवगळ येथील काकासाहेब शिंदे म्हणाले, मी बैलगाडीमध्ये आणलेल्या कापसापैकी केवळ २ क्विंटल ५० किलो कापूस खरेदी करून घेण्यात आला. उर्वरित कापूस या ठिकाणी चालत नसल्याचे ग्रेडरकडून सांगण्यात आले. यानंतर मी विनवणी करूनही उर्वरित कापूस खरेदी करण्यात आला नाही. शिवाय प्रत्येक दिवशी राणी उंचेगाव येथील कापूस खरेदी केंद्रावर बैलगाडीमधील कापसाची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
बैलाच्या पाण्याची असुविधा
राणी उंचेगाव येथील कापूस खरेदी केंद्रावर अनेक शेतकरी बैलगाडीमधून कापूस घेऊन येत आहेत; परंतु येथे बैलाच्या पाण्याची सोय कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी परिसरात मिळेल तेथे बैलांना पाणी पाजतात. याविषयी घनसावंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बाहेकर म्हणाले की, खरेदी केंद्रावर बैलाच्या पाण्याची व्यवस्था लवकरच केली जाईल. या बरोबरच प्रत्येक दिवशी बैलगाड्यांमधील कापूस खरेदी करण्याबाबतचाही निर्णय लवकरच घेतला जाईल.