असंख्य होमगार्ड कोरोना, निवडणूक कामातील मानधनापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:28 IST2021-02-14T04:28:37+5:302021-02-14T04:28:37+5:30
शहागड : कोरोना काळात आणि निवडणुकीत पोलिसांच्या खांद्याला, खांदा लावून कायदा- सुव्यवस्थेचे काम पाहणाऱ्या गोंदी ठाण्यांतर्गत असलेल्या अनेक होमगार्डना ...

असंख्य होमगार्ड कोरोना, निवडणूक कामातील मानधनापासून वंचित
शहागड : कोरोना काळात आणि निवडणुकीत पोलिसांच्या खांद्याला, खांदा लावून कायदा- सुव्यवस्थेचे काम पाहणाऱ्या गोंदी ठाण्यांतर्गत असलेल्या अनेक होमगार्डना अद्याप मानधन मिळालेले नाही. पाठपुरावा करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
गोंदी ठाण्यांतर्गत होमगार्डची संख्या जवळपास १५ आहे. होमगार्डला प्रति दिवस ६७० रुपये वेतन मिळते. निवडणूक असो की सण, उत्सव, मोर्चे, आंदोलन आदी ठिकाणी बंदोबस्तासाठी होमगार्डची मदत घेतली जाते. निवडणूक काळात तर ठाण्यातील संख्या अपूर्ण पडत असल्याने बाहेरून होमगार्ड मागविले जातात. बंदोबस्तावर असताना पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड रात्रंदिवस काम करतात. कोरोनाचा मार्च २०२० मध्ये देशात शिरकाव झाला. त्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू झाले.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापना बंद ठेवण्यात आल्या होत्या. या काळात पोलीस यंत्रणेवर मोठा ताण पडला. तो कमी करण्यासाठी होमगार्डची मदत घेण्यात आली. आठ महिने सलग बंदोबस्त राहिल्यानंतर गेल्या महिन्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. मतदानाच्या एक दिवस अगोदर पासून तर मतमोजणीच्या दिवशी होमगार्डला बंदोबस्तावर घेण्यात आले. ऑक्टोबर महिन्यापर्यंत होमगार्डला नियमित वेतन मिळाले, मात्र त्यानंतर आजपर्यंत वेतन मिळालेले नाही.