पालिकेच्या लेटलतीफ कर्मचा-यांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:49 IST2017-12-19T00:48:39+5:302017-12-19T00:49:09+5:30
नगरपालिकेत १३ लेटलतीफ कर्मचा-यांना सोमवारी अतिरिक्त मुख्याधिकारी केशव कानपुडे यांनी कारणे दाखवा नोेटीस बजावली आहे.

पालिकेच्या लेटलतीफ कर्मचा-यांना नोटिसा
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नगरपालिकेत १३ लेटलतीफ कर्मचा-यांना सोमवारी अतिरिक्त मुख्याधिकारी केशव कानपुडे यांनी कारणे दाखवा नोेटीस बजावली आहे. बायोमेट्रिक मशीन बंद असल्याने नगरपालिका कर्मचा-यांचा मनमानी कारभार सुरू असून, अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारी प्रकाशित केले होते. याची दखल घेत उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी पालिका कार्यालयात सोमवारी सकाळी अचानक विविध विभागांची झाडाझडती घेतली. राऊत यांनी मुख्याधिका-यांना सूचना केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
जालना नगर पालिका कार्यालयातील बायोमेट्रिक मशीन बंद असल्यामुळे कर्मचारी सकाळी उशिरा कार्यालयात येतात. तसेच कार्यालयीन वेळ संपण्यापूर्वीच निघून जातात. या विषयीचे वृत्त लोकमतने सोमवारच्या अंकात प्रकाशित केले होते. याची दखल घेत उपनगराध्यक्ष राजेश राऊत सोमवारी सकाळी पावणेअकरा वाजता पालिका कार्यालयात पोहोचले. अतिरिक्त मुख्याधिकारी केशव कानपुडे यांना सोबत घेऊन राऊत यांनी आस्थापना विभाग, पाणीपुरवठा विभाग, मालमत्ता विभाग, कर विभाग, बांधकाम विभाग, नगररचना विभागात जाऊन प्रत्यक्ष अचानक पाहणी केली. या वेळी तब्बल १३ कर्मचारी कार्यालयात गैरहजर आढळून आले. गैरहजर कर्मचा-यांना नोटिसा देऊन त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याची सूचना राऊत यांनी कानपुडे यांना दिली. तसेच या पुढे असे प्रकार होणार नाहीत यासाठी सर्व कर्मचा-यांना वेळेत कार्यालयात हजर राहण्याबाबत ताकीद देण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, पालिकेत लवकरच बायोमेट्रिक कार्यान्वित करून त्यावर कर्मचा-यांच्या हजेरीची नोंद केली जाईल, अशी ग्वाही अतिरिक्त मुख्याधिकारी कानपुडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.