टेंभुर्णीची निजामकालीन कचेरी अखेर जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:35 IST2021-09-07T04:35:58+5:302021-09-07T04:35:58+5:30
टेंभुर्णी : येथील निजामकालीन कचेरीची जुनी इमारत अखेर शनिवारी जमीनदोस्त करण्यात आली. गावच्या मध्यवस्तीत असलेली ही धोकादायक इमारत पाडण्यास ...

टेंभुर्णीची निजामकालीन कचेरी अखेर जमीनदोस्त
टेंभुर्णी : येथील निजामकालीन कचेरीची जुनी इमारत अखेर शनिवारी जमीनदोस्त करण्यात आली. गावच्या मध्यवस्तीत असलेली ही धोकादायक इमारत पाडण्यास स्थानिक ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेला परवानगी मागितली होती. यानुसार ही इमारत जेसीबीद्वारे जमीनदोस्त करण्यात आली. या धोकादायक इमारतीबाबत यापूर्वी ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते.
येथील मध्यवस्तीत आजपासून ९० वर्षांपूर्वी बांधलेली निजामकालीन कचेरीची इमारत होती. या इमारतीत निजाम राजवटीत गावचा न्यायनिवाडा चालत असे. मात्र, जर्जर झालेल्या या इमारतीचा बहुतांश भाग यापूर्वीच पाडण्यात आला होता. आता फक्त इमारतीच्या मुख्य गेटसह दोन्ही बाजूची जेल व समोरचा दुमजली भाग तेवढा शिल्लक होता. इमारतीच्या या भागात आतापर्यंत पोस्ट ऑफिसचे कार्यालय चालायचे. मात्र, मागील काही वर्षांपासून या इमारतीची अतिशय वाताहात झाल्याने इमारतीचा हा धोकादायक भाग कधीही पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे इमारतीजवळून येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता.
यामुळे ही इमारत पाडण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीने ठराव घेत जि. प. सदस्य शालिकराम म्हस्के यांच्यामार्फत जि.प.कडे पाठपुरावा केला होता. त्यास जि.प.ने अनुमती दिल्याने ही इमारत पाडण्याची कारवाई केल्याचे सरपंच सुमन म्हस्के यांनी सांगितले. ही इमारत पाडल्याने गावातील एक निजामकालीन ऐतिहासिक वारसा कमी झाला असला तरी धोकादायक बनलेली ही इमारत पाडणेही तितकेच गरजेचे होते, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ बोलून दाखवीत आहे.
चौकट
ग्रामपंचायत कार्यालय बनावे
गावच्या मध्यवस्तीत असलेल्या या जागेवर ग्रामपंचायतीचे प्रशस्त कार्यालय उभे करावे. शिवाय गावातील महसूल व कृषीविषयक सर्व कार्यालये या माध्यमातून एकाच ठिकाणी आणावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.
फोटो
टेंभुर्णीतील निजामकालीन कचेरीचा शेवटचा सांगडा शनिवारी जमीनदोस्त करण्यात आला.