उपाध्यक्षपदी निसार पटेल यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:01 IST2021-02-05T08:01:40+5:302021-02-05T08:01:40+5:30
जिल्हाध्यक्षपदी आन्साराम एकनार यांची निवड राजूर : अखिल भटका जोशी समाज सेवा संघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी राजूर येथील आन्साराम एकनार ...

उपाध्यक्षपदी निसार पटेल यांची निवड
जिल्हाध्यक्षपदी आन्साराम एकनार यांची निवड
राजूर : अखिल भटका जोशी समाज सेवा संघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी राजूर येथील आन्साराम एकनार यांची निवड करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष वामन मापारे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी अखिल भटका जोशी समाज सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या निवडीचे गेंदालाल झुंगे, रमेश यज्ञेकर, अनंत शिंदे, बाबासाहेब महापुरे, नारायण गंदाई आदींनी स्वागत केले.
सात दिवसीय प्रशिक्षण
जालना : मिटकॉन प्रशिक्षण केंद्र जालना, जिल्हा पशुसंवर्धन विभाग जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जालना येथे २७ जानेवारीपासून पाच दिवस कृषीवर आधारित प्रशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात बंदिस्त शेळीपालन, दुग्धव्यवसाय याबाबत तज्ज्ञाद्वारे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
५१ जणांचे रक्तदान
जालना : लक्ष्मीनारायणपुरा येथील जय मातादी ग्रुप व आर्यनदादा म्याका मित्रमंडळ यांच्या वतीने श्री लक्ष्मीनारायण मंदिरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ५१ युनिट रक्त संकलित करण्याचे कार्य जालना सामान्य रुग्णालय (घाटी) यांच्यातर्फे करण्यात आले. रक्तदात्यांसाठी शिबिरात चहा-बिस्कीट आणि नाश्त्याची सोय केली होती.
निधी संकलनासाठी शोभायात्रेचे आयोजन
जालना : अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाला मंगळवारपासून प्रारंभ झाला, अशी घोषणा करण्यात आली. राम मंदिर निर्माणासाठी निधी संकलन करण्यात येत आहे. या अभियानाचा प्रारंभ वरुड बुद्रुक येथे २४ जानेवारी रोजी करण्यात आला. या शोभायात्रेत गावातील भजनी मंडळी, ग्रामस्थ, महिला सहभागी झाल्या होत्या.
साष्टपिंपळगाव येथे रॅलीचे आयोजन
वडीगोद्री : साष्टपिंपळगाव येथे मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. अंबड व घनसावंगी तालुक्यातील ४० गावांतील ग्रामस्थांनी दुचाकी रॅली काढून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या रॅलीची सुरुवात घनसावंगी शहरातून झाली. तीर्थपुरी मार्ग गोंदी, साष्टपिंपळगावात ही रॅली पोहोचली. या प्रसंगी तरुणांची उपस्थिती होती.