दुसऱ्या दिवशी ६४ हजार विद्यार्थी शाळेत हजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:04 IST2021-02-05T08:04:56+5:302021-02-05T08:04:56+5:30
जालना : जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा बुधवारपासून सुरू झाल्या आहेत. बुधवारी पहिल्या दिवशी जिल्ह्यातील ४५ हजार १२ विद्यार्थी ...

दुसऱ्या दिवशी ६४ हजार विद्यार्थी शाळेत हजर
जालना : जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा बुधवारपासून सुरू झाल्या आहेत. बुधवारी पहिल्या दिवशी जिल्ह्यातील ४५ हजार १२ विद्यार्थी शाळेत आले होते. दुसऱ्या दिवशी तब्बल ६४ हजार ९२८ विद्यार्थी शाळेत आले होते, तर कोरोना चाचणीत १४ शिक्षक व २७ शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण ४१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सूचनेनुसार शाळास्तरावर निर्जंतुकीकरण, सुरक्षित अंतराची बैठक व्यवस्था, हॅण्ड सॅनिटायझर, थर्मल गन, ऑक्सिमीटर आदींची सुविधा शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली. कोरोनामुळे बंद असलेल्या या शाळांची चालू शैक्षणिक वर्षात प्रथमच बुधवारी घंटी वाजली. पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या मुलांचे पुष्पगुच्छ देऊन शिक्षकांकडून स्वागत करण्यात आले. ऑनलाइन शिक्षणाच्या फेऱ्यात आणि कोरोनामुळे घरात अडकलेले विद्यार्थी शाळेत आल्याने शाळाही गजबजल्या होत्या. दुसऱ्या दिवशी गुरुवारी जिल्ह्यातील १५२४ शाळा भरल्या होत्या. या शाळांमध्ये ६४ हजार ९२८ विद्यार्थी हजर राहिले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये सर्व ती दक्षता घेतली जात असल्याचे दिसून आले.
जालना तालुक्यात सर्वाधिक विद्यार्थी
जालना तालुक्यातील २०५ शाळांमध्ये दुसऱ्या दिवशी सर्वाधिक १७ हजार ३४६ विद्यार्थी हजर झाले होते. बदनापूर तालुक्यातील १३५ शाळांमध्ये ४६१४, अंबड तालुक्यातील २२० शाळांमध्ये दहा हजार ४५६, घनसावंगी तालुक्यातील १७९ शाळांमध्ये ५५०३, परतूर तालुक्यातील १६० शाळांमध्ये ६००९, मंठा तालुक्यातील १५१ शाळांमध्ये ३९९८, भोकरदन तालुक्यातील ३०३ शाळांमध्ये १२ हजार १७८, तर जाफराबाद तालुक्यातील १७१ शाळांमध्ये ४८२४ विद्यार्थी हजर झाले होते.