नवी एमआयडीसी होणार अडीच महिन्यांत सज्ज
By Admin | Updated: January 6, 2017 23:51 IST2017-01-06T23:47:30+5:302017-01-06T23:51:28+5:30
जालना मागील काही महिन्यांपासून येथील औद्योगिक वसाहत क्षेत्रात सुरू असलेल्या टप्पा क्रमांक ३ मधील जलकुंभ उभारणीचे काम पूर्ण झाले

नवी एमआयडीसी होणार अडीच महिन्यांत सज्ज
गणेश कुलकर्णी जालना
मागील काही महिन्यांपासून येथील औद्योगिक वसाहत क्षेत्रात सुरू असलेल्या टप्पा क्रमांक ३ मधील जलकुंभ उभारणीचे काम पूर्ण झाले असून, रस्ते, नाल्या यासारखी कामेही निम्म्याहून अधिक प्रमाणात मार्गी लागली आहेत. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत ही औद्योगिक वसाहत उद्योजकांसाठी सज्ज होणार असल्याचे चित्र आहे.
जालना शहरानजीक औद्योगिक विकास महामंडळाच्या पूर्वीच्या दोनन एमआयडीसी आहेत. परंतु, उद्योजकांची वाढती संख्या लक्षात घेता महामंडळाने टप्पा क्र. १ व २ लगत तिसऱ्या टप्प्याचे कामही सुरू केले आहे. या एमआयडीसीमध्ये पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने १५०० क्युबिक लिटर साठवण क्षमतेची पाण्याची टाकी उभारली आहे. याच ठिकाणाहून नवीन एमआयडीसीतील उद्योजकांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. यासाठी या परिसरात ७.८० कि.मी.लांबीची जलवाहिनी टाकण्यात येत असून, यासाठीचे पाईप येवून पडले आहेत. खोदकाम करून पाईप बसविण्याचे कामही सध्या प्रगतीपथावर असल्याचे दिसून येते.
या भागात वीज पुरवठ्याच्या अनुषंगानेही जवळपास तीनशे पोल उभारले जाणार आहेत. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया संबंधित विभागाकडून पूर्व करण्यात आली आहे. याचे केवळ कार्यारंभ आदेश बाकी असून, ते मिळताच हे काम देखील सुरू होणार आहे. याशिवाय परिसरात ७.६८ किमी लांबीचे रस्ते तयार करण्यात येत आहेत. यातील मुख्य रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले असून, अंतर्गत रस्त्याची कामे सुरू आहेत. ही सर्व कामे सुमारे २८ कोटी रुपये खर्चाची असून, अडीच महिन्यांत पूर्ण होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.