पारध परिसरात भाजप विरूद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:26 IST2020-12-23T04:26:43+5:302020-12-23T04:26:43+5:30
पारध : भोकरदन तालुक्यातील १२४ ग्रामपंचायतीपैकी ९१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यात पारध (बु.) व परिसरातील ग्रामपंचायत निवडणुकीत ...

पारध परिसरात भाजप विरूद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार
पारध : भोकरदन तालुक्यातील १२४ ग्रामपंचायतीपैकी ९१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यात पारध (बु.) व परिसरातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप विरूध्द राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. अधिकाधिक ग्रामपंचायती आपल्याच पक्षाच्या ताब्यात रहाव्यात, यासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह माजी आमदार चंद्रकांत दानवे हे व्यूहरचना आखत आहेत.
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच गावात पक्षपुरस्कृत पॅनल तयार करण्यासाठी पॅनल प्रमुख मोर्चेबांधणी करीत आहेत. पारध आणि परिसतील राजकारण हे भाजपचे रावसाहेब दानवे व राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे यांच्या भोवतीच फिरते. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महाआघाडीची सत्ता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी सोबत काँग्रेस व शिवसेनाही काही ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्यासाठी प्रोत्साहन देताना दिसत आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे गावपातळीवरील सर्वच निवडणुकांकडे विशेष लक्ष असते. तसेच आ. संतोष दानवे यांनीही या निवडणुकीत लक्ष घालून जास्तीत जास्त ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात राहाव्यात यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दुसरीकडे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनीही जास्तीत जास्त ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीच्या ताब्यात याव्यात यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
पारधमध्ये भाजपा, राष्ट्रवादीची युती?
पारध (बु.) ग्रामपंचायतीत १५ सदस्य आहेत. या निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादीची युती करण्याच्या दृष्टीने दोन्ही पक्षांच्या गावातील पुढाऱ्यांचे प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे. मागील पंचवार्षिकमध्ये पारध (बु.) ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत युती करून सत्ता मिळवली होती. मात्र यावेळी शिवसेनेला बगल देऊन भाजपाबरोबर निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या निर्णयाचा चेंडू सध्या माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या कोर्टात असल्याचे समजते.
शासन निर्णयामुळे संभ्रम
शासनाने राज्यातील काही जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे सरपंचपदाचे आरक्षण सुटलेल्या प्रवर्गातील इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत अधिक स्पष्टता मिळत नसल्याने इच्छुकांची चलबिचल सुरू आहे.