घाणेवाडी तलावातील पाण्याचे नैसर्गिकरीत्या रोखणार बाष्पीभवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:46 IST2021-02-23T04:46:32+5:302021-02-23T04:46:32+5:30
विजय जालना : नवीन जालना भागाला पाणीपुरठा करणाऱ्या घाणेवाडी प्रकल्पातील पाण्याचे होणारे बाष्पीभवन नैसर्गिकरीत्या रोखले जाणार आहे. त्यासाठी पालिकेने ...

घाणेवाडी तलावातील पाण्याचे नैसर्गिकरीत्या रोखणार बाष्पीभवन
विजय
जालना : नवीन जालना भागाला पाणीपुरठा करणाऱ्या घाणेवाडी प्रकल्पातील पाण्याचे होणारे बाष्पीभवन नैसर्गिकरीत्या रोखले जाणार आहे. त्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. राज्यासाठी मॉडेल ठरणाऱ्या या प्रकल्पांतर्गत घाणेवाडी तलावाच्या परिसरात तब्बल दीड लाखावर बांबूंची लागवड केली जाणार आहे. बांबू लागवडीमुळे पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासह पर्यावरण समतोल ठेवण्यास मदत होणार आहे.
निजामाच्या काळात ९० वर्षांपूर्वी घाणेवाडी येथील प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रकल्प बांधताना उथळ जमीन परिसर पाहून बांधण्यात आला असून, येथून स्वयंचलित यंत्रणेद्वारे नवीन जालना भागाला पाण्याचा पुरवठा केला जातो. ९० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या तलावाची मूळ पाणी साठवण क्षमता १४ दलघमी होती; परंतु १९७८ साली काही कारणास्तव सांडवा तोडल्याने ही साठवण क्षमता १० दलघमीवर आली. त्यातही जळपास ३ ते ३.५० दलघमी गाळ साचला असून, तलावातील जवळपास १.७५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होते, तर गळतीमध्ये साधारणत: २ ते २.५ दलघमी पाणी वाया जाते. ही बाब पाहता जालना नगरपालिकेने पुणे येथील मार्क सिव्हिल टेक्नॉलॉजी कंपनीच्या ‘माता रमाई सिंचन मूल्यवर्धन’ प्रकल्पांतर्गत घाणेवाडी तलावातील पाण्याचे नैसर्गिकरीत्या बाष्पीभवन रोखण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.
या प्रकल्पांतर्गत जवळपास ४५० एकरांवर विस्तारलेल्या घाणेवाडी प्रकल्पात साचलेला एक ते दीड दलघमी गाळ काढला जाणार आहे. गाळ काढून प्रकल्पाची खोली वाढविली जाणार असून, निघणारा भराव पूर्ण पाणीपातळीतील कंटूर लाइन निवडून तेथे टाकला जाणार आहे. प्रकल्पाची खोली वाढणार असल्याने परिसरातील बुडीत क्षेत्रातील जवळपास ८० ते १०० एकर जमीन पुनर्वापरासाठी उपलब्ध होणार आहे. याच कामात प्रकल्पाला लागलेली गळतीही रोखली जाणार आहे. या प्रकल्पाच्या चारही बाजूंनी ६.५० किलोमीटरच्या घेऱ्यात उंच वाढणाऱ्या एक ते दीड लाख बांबूंची लागवड केली जाणार आहे. जंगल पद्धतीने लावल्या जाणाऱ्या बांबूंमुळे प्रकल्पावर जाणारी कोरडी हवा रोखली जाणार आहे. उंच वाढणारे बांबू हे इतर झाडांच्या तुलनेत सहापट अधिक हवेतील कार्बन शोषून घेतात. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासह प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवनही नैसर्गिकरीत्या रोखले जाणार आहे. हे काम पूर्णत्वास आल्यानंतर या प्रकल्पातील जवळपास ३.७५ दलघमी पाणी वाचणार असून, याचा पालिकेला आणि पर्यायाने शहराला लाभ होणार आहे.
प्रकल्पाचे असे होतील लाभ
इतर वृक्षांपेक्षा बांबूचे झाड हवेतील कार्बन सहापट अधिक शोषून घेते. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाणार आहे.
या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर जवळपास ३.७५ दलघमी पाण्याची बचत होणार आहे.
घाणेवाडीतून अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार असल्याने नगरपालिकेचा जायकवाडी प्रकल्पावरील ताण आणि वीज बिल कमी होण्यास मदत होणार आहे.
बांबू लागवड, संवर्धन, विक्रीमुळे नगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहे.
सांडव्याजवळ होणार बगिचा
हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर सांडव्याजवळ बगिचा, लहान मुलांसाठी खेळणी, नयनरम्य वृक्ष, फुलझाडींची लागवड करण्याचे नियोजनही नगरपालिकेने केले आहे. त्यामुळे हा पथदर्शी प्रकल्प पूर्णत्वास आला तर जालना शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना पर्यटनासाठी निसर्गरम्य ठिकाण उपलब्ध होणार आहे.
सर्वेक्षण सुरू
नगरपालिकेने घाणेवाडी प्रकल्पातील पाण्याचे नैसर्गिकरीत्या बाष्पीभवन रोखण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचा सर्व्हे सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर शासनाकडे निधीची मागणी केली जाणार आहे.
नितीन नार्वेकर
मुख्याधिकारी, नगर परिषद, जालना