नामस्मरणाने मानवी जीवनाचा उद्धार होतो- सत्यात्मतीर्थ स्वामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 00:55 IST2019-12-08T00:55:11+5:302019-12-08T00:55:27+5:30
नामस्मरणातून तुमचे जीवन सफल आणि सुखमय होण्यास निश्चितपणे मदत होते, असे मार्गदर्शन श्रीमत उत्तरादी मठाधीश श्री श्री १००८ सत्यात्मतीर्थ स्वामी श्रीपाद यांनी केले.

नामस्मरणाने मानवी जीवनाचा उद्धार होतो- सत्यात्मतीर्थ स्वामी
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मानवी जीवन हे मागील जन्मातील पुण्याईमुळे मिळाले आहे. प्रत्येकाने मिळालेले हे जीवन सार्थकी लागावे, यासाठी ईश्वर, गुरूचे नामस्मरण केले पाहिजे, नामस्मरणातून तुमचे जीवन सफल आणि सुखमय होण्यास निश्चितपणे मदत होते, असे मार्गदर्शन श्रीमत उत्तरादी मठाधीश श्री श्री १००८ सत्यात्मतीर्थ स्वामी श्रीपाद यांनी केले.
जालना शहरातील योगेश्वरी नगरमधील योगेश्वरी देवी मंदिरात शनिवारी त्यांच्या विशेष प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधीवत पूजा करण्यात आली. प्रवचन कार्यक्रमात सत्यात्मतीर्थ स्वामी म्हणाले की, नामस्मरणाने केवळ व्यक्तीचाच उध्दार होतो, असे नाही तर त्याच्या कुळाचाही उध्दार होतो. आपण केलेले पाप हेच आपल्या दु:खाचे मूळ कारण असल्याचे त्यांनी सांगितले. नेहमी हसत चित्ताने राहिले पाहिजे. जीवन जगताना अनेक संकटं, प्रश्न हे निर्माण होत असतात. या प्रश्नांवर मात करण्यासाठी अध्यात्माची साधना आवश्यक आहे.
नामस्मरण करत असताना आपले चित्त हे एकाग्र असले पाहिजे. त्यावेळी कुठलेही विचार मनात आणू नयेत. आपल्या थोर संतांनी देखील नामस्मरणाचे महत्त्व विशद केले आहे. यावेळी सत्यात्मतीर्थ स्वामी यांनी दररोजचे जीवन जगताना पूजा, अर्चा, जप-तप का केले पाहिजे याचे सविस्तर विवेचन केले. कार्यक्रमास मूलराम पूजन, आरती, महाप्रसाद इ. कार्यक्रम पार पडले. मराठवाड्यातून स्वामींच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीततेसाठी निवृत्त प्राचार्य सुरेश संदीकर, दीपक रणनवरे, संजय देशपांडे, किशोर देशपांडे, प्रफुल्ल निटूरकर, राजेंद्र वालूरकर, रवींद्र देशपांडे, धनंजय याडकीकर, सुनील कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुत्माचार्य यांनी केले तर आभार सोनाली देशमुख यांनी मानले.