अनैतिक संबंधाला अडथळा ठरत असल्याने ‘त्या’ महिलेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:28 IST2021-01-18T04:28:27+5:302021-01-18T04:28:27+5:30
पतीनेही घेतले विष; भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क भोकरदन : तालुक्यातील कुंभारी येथील ...

अनैतिक संबंधाला अडथळा ठरत असल्याने ‘त्या’ महिलेचा खून
पतीनेही घेतले विष; भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : तालुक्यातील कुंभारी येथील आशा साळवे या महिलेचा खून हा लहान भावजयीसोबतच्या अनैतिक संबंधाला अडथळा ठरत असल्याने झाल्याची तक्रार मयत महिलेच्या भावाने पोलिसात दिली आहे. विशेष म्हणजे पत्नीचा खून केल्यानंतर घाबरलेल्या पतीनेही विषारी औषध प्राशन केले असून, त्याच्यावर जालना येथे उपचार सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक सी. पी. काकडे यांनी सांगितले.
मयत महिलेचा भाऊ राजू कडूबा पगारे (रा. नळणी बु., ता. भोकरदन) यांनी दिलेल्या फियार्दीनुसार आशा हिचा २० वर्षांपूर्वीच भोकरदन तालुक्यातील कुंभारी येथील रतन सांडू साळवे याच्यासोबत विवाह झाला होता. त्यांना दोन अपत्ये आहे. मात्र, रतन साळवे याचे त्याच्या लहान भावजयीसोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे तो पत्नी व मुलांना नेहमी त्रास देऊन मारहाण करत असे. अनेकदा त्याच्या या त्रासाला कंटाळून आशा ही आपल्या माहेरी नळणी बुद्रुक येथे येत असे. दरम्यान, गावात कामधंदा नसल्याने गेल्या काही वर्षांपासून हे सर्वजण वडगाव कोल्हाटी (ता. औरंगाबाद) येथे राहात होते. शुक्रवारी कुंभारी ग्रामपंचायतीची निवडणूक असल्याने पती-पत्नी दोघेही १४ जानेवारी रोजी कुंभारी येथे आले होते. शनिवारी सायंकाळी रतन साळवे यांच्या घराला कुलूप होते. मात्र, खिडकी उघडी असल्याने घराशेजारी खेळत असलेल्या एका लहान मुलीने खिडकीतून आत बघितल्यानंतर हा खुनाचा प्रकार समोर आला होता.
खून करून घेतले विषारी औषध
संशयित पतीने पत्नीचा काटा काढण्यासाठी डोक्यावर जबर मारहाण केली. यानंतर स्वत:ही विषारी औषध प्राशन केले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर भोकरदन ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.