मुंबई-पुण्याने वाढविली जिल्ह्याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:30 IST2021-04-01T04:30:29+5:302021-04-01T04:30:29+5:30

दोन ते तीन महिन्यांपूर्वी राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची घट झाली होती. परंतु, मागील काही दिवसांपासून मुंबई, पुणे, औरंगाबाद, ...

Mumbai-Pune raises district concerns | मुंबई-पुण्याने वाढविली जिल्ह्याची चिंता

मुंबई-पुण्याने वाढविली जिल्ह्याची चिंता

दोन ते तीन महिन्यांपूर्वी राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची घट झाली होती. परंतु, मागील काही दिवसांपासून मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर यासह मोठ्या शहरांमध्ये रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. परिणामी, येथे कामासाठी गेलेले लोक पुन्हा आपल्या गावी परत येत आहेत. या नागरिकांची जिल्हा प्रशासनाकडून तपासणीदेखील केली जात नाही. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जालना जिल्ह्यात २५ हजार ८६९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर २२ हजार ८६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ४८९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

बाहेरगावातून येणाऱ्यांची चाचणीच नाही

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली होती. वाढती रुग्णसंख्या प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. असे असतानाही नागरिक याकडे दुर्लक्ष करीत आहे.

दुसरीकडे बाहेरगावातून येणाऱ्यांची प्रशासनाकडून तपासणीच केली जात नाही. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने बाहेरगावाहून येणाऱ्यांची तपासणी करणे गरजेचे आहे.

बहुतांश लोक एसटी, ट्रॅव्हल्स व रेल्वेने प्रवास करतात. प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन होत नाही. त्यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चार एसटी बसस्थानक

जालना जिल्ह्यात चार बसस्थानक आहेत. यात जालना, अंबड, भोकरदन, जाफराबाद यांचा समावेश आहे. या बसस्थानकात दररोज १०० ते १५० प्रवासी मुंबई, पुणे येथून येतात. त्यांची तपासणी केली जात नाही.

ट्रॅव्हल्स

मुंबई व पुण्याहून जालना येथे दररोज १० ते १२ ट्रॅव्हल्स येतात. या ट्रॅव्हल्सद्वारे दररोज ७० ते ८० प्रवासी जालना जिल्ह्यात येतात. त्या प्रवाशांचीदेखील तपासणी केली जात नाही.

रेल्वेस्थानक

मुंबई व पुण्याहून जालना येथे येण्यासाठी दररोज ७० ते ८० प्रवासी येतात. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीदेखील तपासणी केली जात नाही.

Web Title: Mumbai-Pune raises district concerns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.