महावितरणच्या अधिका-यांना मंदिरात कोंडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:30 IST2017-12-17T00:30:20+5:302017-12-17T00:30:30+5:30
कृषी पंपाचा वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी आंदोलक शेतक-यांशी चर्चा करण्यास गेलेल्या महावितरणच्या अभियंत्यांना ग्रामस्थांनी गावातील मारोती मंदिरात कोंडून टाकले

महावितरणच्या अधिका-यांना मंदिरात कोंडले
बदनापूर : कृषी पंपाचा वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी आंदोलक शेतक-यांशी चर्चा करण्यास गेलेल्या महावितरणच्या अभियंत्यांना ग्रामस्थांनी गावातील मारोती मंदिरात कोंडून टाकले. तालुक्यातील चनेगाव येथे शनिवारी दुपारी हा प्रकार घडला.
तालुक्यातील चनेगाव येथील कृषीपंपांचे वीजबिल थकल्यामुळे वीजपुरवठा एक डिसेंबरपासून खंडित आहे. याविषयी शेतकरी संघटनेने १६ डिसेंबरला रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. राजूर-दाभाडी रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दुपारी रास्ता रोको आंदोलनास सुरुवात झाली. वीज भारनियमन कमी करावे, कृषिपंपांचा खंडित वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करावा, अशी मागणी शेतक-यांनी केली. आंदोलक शेतक-यांची चर्चा करण्यासाठी दाभाडी येथील सहायक अभियंता अमरपाल खुशाल मून, आर. डी. पुंगळे, प्रदीप शेकळे, विजय दुधाने, विलास जाधव हे अन्य कर्मचा-यांसह चनेगाव येथे गेले. या वेळी शेतक-यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याची विनंती केली. मात्र अधिका-यांनी थकित बिलाचा भरणा केल्याशिवाय वीजपुरवठा सुरळीत होणार नाही, असे सांगितले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी अधिका-यांना गावातील मारोती मंदिरात कोंडून बाहेरून कुलूप लावून घेतले.
हा प्रकार समजल्यानंतर बदनापूर ठाण्याचे सहायक निरीक्षक बोलकर, कॉन्स्टेबल जॉन कसबे, एस. पी. चव्हाण हे गावात पोहोचले. पोलिसांनी ग्रामस्थांशी चर्चा करून तासाभरानंतर अभियंत्यांना बाहेर काढले.
दरम्यान, या प्रकरणी अमरपाल खुशाल मून यांनी दिलेल्या तक्रारीवरून निवृत्ती शेवाळे, नामदेव निहाळ, सदाशिव जायभाये, ढोरकूल, कृष्णा घुगे यांच्यासह शेतकरी संघटनेच्या ५० ते ६० जणांवर बदनापूर ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल झाला. कॉन्स्टेबल कसबे तपास करीत आहेत.