महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:37 IST2021-02-17T04:37:11+5:302021-02-17T04:37:11+5:30
महावितरण कंपनीने गेल्या आठ दिवसांपासून राजूरसह परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा थकीत वीजबिल वसुलीसाठी बंद करण्याचा सपाटा लावला आहे. सध्या ...

महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा घेराव
महावितरण कंपनीने गेल्या आठ दिवसांपासून राजूरसह परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा थकीत वीजबिल वसुलीसाठी बंद करण्याचा सपाटा लावला आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. परंतु, महावितरणने वीज कनेक्शन बंद करण्याची धडक मोहीम सुरू केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला. शेतकरी आर्थिक संकटात असून, त्यांची रब्बी हंगामातील पिकांवर मदार आहे. महावितरणने ऐन पिकांना पाणी भरणीच्या हंगामात वीजपुरवठा खंडित करण्याचे सत्र सुरू केल्याने शेतकरी संतप्त झाले होते. मंगळवारी सकाळी शेतकऱ्यांनी राजूर उपकेंद्रात सहाय्यक अभियंता गावंडे यांना घेराव घालून प्रश्नांचा भडीमार केला. तसेच वीजपुरवठा पूर्ववत झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी सहाय्यक अभियंता गावंडे यांनी शेतकऱ्यांनी येत्या चार दिवसांत टप्प्याटप्प्याने थकबाकी भरावी, असे सांगून वीजपुरवठा सुरळीत करण्याची हमी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी माजी उपसभापती गजानन नागवे, रावसाहेब भंवर, निवृत्ती शेवाळे, विनोद पुंगळे, कोंडीराम सावंत, अशोक मुटकुळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
फोटो