पाच तरुणांच्या अपघाताने मंठा तालुक्यात शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:47 IST2021-02-23T04:47:42+5:302021-02-23T04:47:42+5:30

हा अपघात रविवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास औरंगाबाद ते नगर मार्गावर घडला. या अपघातात खासगी बस व कार क्र.एम ...

Mourning in Mantha taluka over the accident of five youths | पाच तरुणांच्या अपघाताने मंठा तालुक्यात शोककळा

पाच तरुणांच्या अपघाताने मंठा तालुक्यात शोककळा

हा अपघात रविवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास औरंगाबाद ते नगर मार्गावर घडला. या अपघातात खासगी बस व कार क्र.एम एच २१ बीएफ. ७१७८ ची समोरासमोर धडक होऊन अत्यंत भीषण अपघात झाला. या अपघातात मंठा तालुक्यातील पाच तरुण ठार झाले. यामध्ये शंतनू नायबराव काकडे वय २२ वर्षे रा.जयपूर, कैलास विठ्ठल नेवरे ,वय २३ वर्षे रा.मेसखेडा , रमेश दशरथ घुगे ,वय २२ वर्षे रा. मेसखेडा, विष्णू उद्धव चव्हाण ,वय २२ वर्षे,रा.मेसखेडा , नारायण दिगंबर वरकड ,वय २४ वर्षे रा. तळतोंडी या पाच तरुणांचा समावेश आहे. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण मंठा तालुक्यावर शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान हे पाचही मित्र मंठा तालुक्यातील एका मित्राच्या लग्नासाठी वडाळा ता. नेवासा या ठिकाणी गेल्याचे सांगण्यात आले. लग्न लावून तेथून पुढे कशासाठी आणि कुठे गेले होते, याबाबत त्यांनी कुणालाच सविस्तर सांगितले नसल्याचे समजते. त्यामुळे कुणी शिर्डी ,पुणे, मुंबईला जात होते, असे सांगत आहेत.

यातील नारायण दिगंबर वरकड हा ड्रायव्हर असून, त्याचे वडील आणि भाऊ शेतकाम करतात. रमेश दशरथ घुगे या तरुणाला दोन मुलं, पत्नी, दोन भाऊ एक बहीण व थकलेले वडील आहेत. कैलास नेवरे याला एक मुलगा, एक मुलगी एक भाऊ, पत्नी, आई - वडील आहेत. मागील पंचवार्षिकमध्ये कैलास नेवरे हा युवक मेसखेडा येथील सरपंच होता. विष्णू चव्हाण या तरुणाच्या मागे पत्नी, एक मुलगा एक भाऊ व आई - वडील आहेत. तर शंतनू नायबराव काकडे हा मुलगा छत्रपती शिवाजी महाराज मजूर सहकारी संस्थेचा संचालक होता. तो भाजपचा राजकीय कार्यकर्ता असून, आता नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्याने चांगली कामगिरी करून नऊच्या नऊ जागा निवडून आणण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता, तसेच शंतनू काकडे या मुलाचे वडील मयत झालेले असून घरची सर्व जबाबदारी त्यावरच होती. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन बहिणी आणि आई असा परिवार आहे. दरम्यान या मुलांचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईक घटनास्थळाकडे गेले असून, संध्याकाळपर्यंत मृतदेह गावाकडे येतील, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान मेसखेडा येथील तीन तरुणांवर सोमवारी सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. तर जयपूर आणि तळतोंडी येथील युवकांवरही सायंकाळीच अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

चौकट

आता आम्ही कुणासाठी जगाव...

पती गेले, आता पतीनंतर घरचा करता मुलगा आमच्या जीवाला चटका देऊन गेला. आम्ही कुणाच्या जीवावर जगावं, असे म्हणत शंतनू काकडे या युवकाची आई कौशल्याबाई काकडे व पत्नी अंजुबाई देखील पतीच्या निधनाने हंबरडा फोडत कालची रात्र आमच्यासाठी काळ रात्र होती, असे म्हणत रडत होत्या तर इतर नातेवाईक त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते.

Web Title: Mourning in Mantha taluka over the accident of five youths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.