आई-बाबा, स्वत:साठी-आमच्यासाठी मास्क वापरा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:44 IST2021-02-26T04:44:16+5:302021-02-26T04:44:16+5:30
जालना : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने शाळा बंद झाल्या आहेत. अनेक शाळकरी मुले घरी असून, कुटुंबातील सदस्य मास्क ...

आई-बाबा, स्वत:साठी-आमच्यासाठी मास्क वापरा !
जालना : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने शाळा बंद झाल्या आहेत. अनेक शाळकरी मुले घरी असून, कुटुंबातील सदस्य मास्क वापरासह इतर सूचनांचे पालन करतात का, याबाबत त्यांच्याशी संवाद साधला असता बहुतांश पालक बाहेर जाताना मास्क वापरत असल्याचे सांगण्यात आले. जे पालक मास्कसह इतर सूचनांकडे दुर्लक्ष करतात, त्यांना मास्क वापरण्याबाबत ही मुले आठवण करून देत आहेत.
जिल्ह्यात दिवसाकाठी शंभरावर कोरोनाग्रस्त आढळून येत आहेत. जिल्ह्यातील बाधितांची संख्या तब्बल १४ हजार ९७८ वर गेली आहे. तर, त्यातील ३८६ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातील उपचारानंतर १३ हजार ८३७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना लसीकरण सुरू असले, तरी सर्वसामान्यांना लस मिळण्यासाठी मोठा विलंब होणार आहे. लसीचे दोनतीन डोस पूर्ण झाल्यानंतर ॲण्टीबॉडीज शरीरात तयार होणार आहेत. त्यामुळे लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण हाेईपर्यंत मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझर वापरणे, हात धुणे या उपाययोजना आपल्याला कोरोनापासून दूर ठेवणार आहेत. हीच बाब मध्यंतरी शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी सांगितली होती. घरातील सदस्यही याबाबत चर्चा करीत असल्याने आम्हाला या उपाययोजनांची माहिती झाली. त्यामुळे बाहेर जाताना आम्ही मास्क घालतो, घरी आल्यानंतर हात धुतो. कोणी याकडे दुर्लक्ष करीत असेल, तर त्यांनाही सूचनांची आठवण करून दिली जाते, असेही काही शाळकरी मुलांनी सांगितले.
माझे वडील शिक्षक असल्यामुळे आम्ही सक्तीने कोरोनाचे सर्व नियम पाळतो. आई शेतात जाताना मास्क विसरली तर आम्ही तिला आठवण करून देतो. कोणी सूचनांकडे दुर्लक्ष करीत असेल तर त्यांना सूचनांची आठवण करून दिली जाते.
-सुप्रिया काळे, बामखेडा
आई-वडील कामानिमित्त बाहेर जाताना मास्क विसरले तर त्यांना आठवण करून दिली जाते. बाहेरून आल्यानंतर हात-पाय स्वच्छ करूनच घरात येतात. घरी येणाऱ्यांना कोरोनातील सूचनांची आठवण करून दिली जाते.
-शिफा कुरेशी, पारडगाव
कोरोनामुळे शाळा बंद झाल्या आहेत. कोरोनाची रुग्णसंख्याही वाढत आहे. त्यामुळे घरातील सर्व सदस्यांनी बाहेर जाताना मास्क वापरावा, असा अट्टहास आम्ही करतो. सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांनाही आठवण करून दिली जाते.
-ज्योती साकळकर, मापेगाव
वडील पिग्मी एजंट असून, त्यांचा अनेकांशी संपर्क येतो. त्यामुळे बाहेर जाताना त्यांना मास्कची आठवण करून दिली जाते. बाहेरून आल्यानंतर सॅनिटायझरने हात धुण्यास सांगितले जाते.
-कल्पिता तौष्णीवाल, बदनापूर
मध्यंतरी, कोरोनाचा फैलाव कमी झाल्याने मास्कसह इतर बाबींकडे दुर्लक्ष झाले होते. परंतु, नंतर कोरोनाचा फैलाव वाढल्यामुळे मास्कसह इतर सूचनांचे सर्व जण पालन करतात. कुटुंबातील सदस्य घराबाहेर जात असतील, तेव्हा आम्ही त्यांना मास्कची आठवण करून देतो.
-राहुल राजपूत, वडीगोद्री
कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे शाळा बंद झाल्या आहेत. शहरात बाहेर गेल्यानंतरही अनेकांच्या चेहऱ्यावर कोरोनाची भीती दिसून येते. त्यामुळे आम्ही मास्क घालूनच बाहेर जातो. कुटुंबातील सर्वांना सूचनांचे पालन करण्याबाबत सांगितले जाते.
-तुषार बगडिया, परतूर
स्वत:ची काळजी घ्या आणि आईबाबांचीही काळजी घ्या!
n प्रथम तुम्ही स्वत:ची काळजी घ्या. तसेच आई-वडील, भाऊ-बहीण, शेजाऱ्यांचीही काळजी घ्या. वडीलधाऱ्या मंडळींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसलीच, तर त्यांना तातडीने दवाखान्यात घेऊन जा. त्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्ययंत्रणा सज्ज आहे.
n आई-वडिलांना कामानिमित्त बाहेर जावे लागते. बाहेर जाताना ते मास्क लावतात का? बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुतले का? सॅनिटायझर वापरले का, हेदेखील पाहा, असा सल्ला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या पत्रातून शालेय विद्यार्थ्यांना दिला आहे.
कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण गत काही दिवसांमध्ये वाढले आहे. वाढत्या रुग्णसंख्येला अटकाव करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना यश येण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करणे, कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर सुरक्षित अंतराचे पालन करणे, सॅनिटायझर वापरणे, घरी गेल्यानंतरही हात-पाय स्वच्छ धुणे, शक्य झाल्यास अंघोळ करूनच घरात प्रवेश करावा. या सूचनांचे पालन केले तर कोरोनाला अटकाव करण्यास मोठी मदत होणार आहे.
- डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जालना