बदलीसाठीचा व्हिडिओ टाकून गायब झालेला हवालदार सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:31 IST2021-09-03T04:31:02+5:302021-09-03T04:31:02+5:30
घनसावंगी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार गोविंद कुलकर्णी यांनी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांची भेट घेऊन काही दिवसांपूर्वी ...

बदलीसाठीचा व्हिडिओ टाकून गायब झालेला हवालदार सापडला
घनसावंगी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार गोविंद कुलकर्णी यांनी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांची भेट घेऊन काही दिवसांपूर्वी विनंती बदलीचा अर्ज केला होता. मात्र, आतापर्यंत दोन ते तीन बदल्यांच्या याद्या निघूनही गोविंद कुलकर्णी यांची बदली झाली नसल्याने ते नाराज होते. त्यामुळे गोविंद कुलकर्णी यांनी गुरुवारी एका व्हाॅट्सॲप ग्रुपवर स्वतःचा व्हिडिओ बनवून त्यामध्ये माझी संध्याकाळपर्यंत बदली झाली नाही तर मी अज्ञात ठिकाणी जाऊन आत्मदहन करीन, असा इशारा दिला. या इशाऱ्यामुळे जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी पथके पाठवून गोविंद कुलकर्णी यांचा शोध घेतला. त्यांच्या नातेवाईकांची चौकशी केली असता, ते जालना शहरात असल्याचे पोलिसांना कळाले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून, त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याची माहिती सपोनि. टाक यांनी दिली.
दोन महिन्यातील दुसरी घटना
काही दिवसांपूर्वीच जालना तालुक्यातील सेवली पोलीस ठाण्याचा एक कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची चिठी लिहून गायब झाला होता. या घटनेला दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. त्यातच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
गोविंद कुलकर्णी यांनी कुठल्याही प्रकारचा अर्ज केला नव्हता. त्यामुळे बदली देण्यात आली नाही. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल.
विनायक देशमुख, पोलीस अधीक्षक, जालना