जालना : गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील जवळपास ४८ दूध उत्पादक संस्थांच्या सभासदांचे एक कोटी दहा लाख रुपयांचे अनुदान थकले आहे. विशेष म्हणजे दूध शीतकरण केंद्राचे वीजबिल साडेआठ लाख रुपयांचे थकले असून, महावितरणने यासाठी निर्वाणीचा इशारा दिला आहे. जालना जिल्ह्यात एकूण ६० पेक्षा अधिक दूध उत्पादक नोंदणीकृत संस्था आहेत. त्यात जवळपास ८ हजारपेक्षा अधिक सभासद सदस्य असून, हे सर्वजण दररोज संकलित केलेले दूध हे जालन्यातील जेईएस महाविद्यालय तसेच अन्य शासकीय दूध संकलन केंद्रांवर आणून घालतात. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून मिळणारे अनुदान थकल्याने आधीच अडचणीत असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना लाल फितीचा फटका बसला आहे.
हे अनुदान मिळावे म्हणून जालन्यातील जिल्हा दुग्ध विकास विभागाने वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठिवला आहे. परंतु तो अद्याप मंजूर न झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यासंदर्भात दूध उत्पादक शेतकरी आ. कैलास गोरंट्याल तसेच माजी पशुसंवर्धन मंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती दूध उत्पादक शेतकरी संतोष सुपारकर यांनी दिली.
चौकट
दूध शीतकरण केंद्राची अडचण
जालन्यातील दूध शीतकरण केंद्रात दररोज साधारपणे चार हजार लीटर दूध संकलन करून त्यावर प्रक्रिया केली जाते. नंतर हे दूध संस्थांकडून घेऊन नंतर मुंबई तसेच अन्य मोठ्या शहरांमध्ये टँकरमधून पाठविण्यात येते. तो वाहतूक खर्च तसेच केंद्राचे वीजबिल साडेआठ लाख रूपये थकले असून, ते विनंती करून वीज पुरवठा तोडण्यापासून सध्या थांबविल्याचे सांगण्यात आले.