जालना : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मास्क, सुरक्षित अंतराचे पालन याबरोबरच लसीकरणही तेवढेच महत्वाचे असून जालना जिल्हा लसीकरणाच्या बाबतीमध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये मागे राहू नये यासाठी प्रत्येक तालुक्यात लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन करून लसीकरणाचा वेग अधिक प्रमाणात वाढलाच पाहिजे, असे स्पष्ट निर्देश देत लसीकरणात कुठलीही तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी स्पष्ट केले.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत जिल्हा कृती दलाच्या बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी आयोजन करण्यात आले होते..
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले, विशेष भूसंपादन अधिकारी अंजली कानडे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, आदींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले, जिल्ह्यात लसीकरणासाठी जवळपास २७८ केंद्ो असून पुरेशा प्रमाणात मनुष्यबळाबरोबरच मुबलक प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध असतानासुद्धा अपेक्षित प्रमाणात लसीकरण होत नसल्याचे दिसत आहे. लसीकरणासाठी सर्व साधनसामग्री उपलब्ध असल्याने जालना जिल्हा इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये मागे राहणार नाही, यासाठी लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन करून जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी दिले.
ग्रामीण भागातील ज्या नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे व दुसरा डोस घेणे बाकी आहे, अशा नागरिकांना त्यांच्या दुसऱ्या डोसची माहिती वेळेत मिळत नसल्याने ते लसीपासून वंचित राहतात. आरोग्य विभागाने दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांची यादी ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांना उपलब्ध करून देत त्यांच्यामार्फत गावोगावी जाऊन नागरिकांना त्यांच्या दुसऱ्या डोसची माहिती द्यावी, असेही सुचविले.
चौकट
मिशन कवच कुंडल
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिंदल म्हणाले, जालना जिल्ह्यात लसीकरणाला गती देण्यासाठी मिशन कवच कुंडल राबविण्यात येत असून या मोहिमेंतर्गत लसीचा एकही डोस न घेतलेले लाभार्थी, दिव्यांग, गंभीर आजार असलेले लाभार्थी, गरोदर माता, तसेच १८ वर्षांवरील लाभार्थ्यांना लसीचा डोस देण्यासाठी या मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असल्याचे सांगत एकही पात्र लाभार्थी लसीपासून वंचित राहणार नाही, याची सर्व संबंधितांनी दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
चौकट
सहा लाख जणांनी घेतली लस
जिल्ह्यात आजपर्यंत सहा लक्ष १३ हजार ७७९ नागरिकांना लसीचा पहिला डोस, तर दोन लाख १५ हजार ७०७ नागरिकांना दुसरा अशा प्रकारे एकूण आठ लक्ष २९ हजार ४८६ नागरिकांना लस टोचण्यात आली असून यामध्ये कोविशिल्ड लसीचा सहा लाख ८७ हजार ७९९ नागरिकांना, तर कोव्हॅक्सिन लसीचा १ लक्ष ४१ हजार ७८७ नागरिकांना डोस देण्यात आला आहे. जिल्हास्तरावर कोविशिल्ड लसीचे २० हजार, तर कोव्हॅक्सिन लसीचे २७ हजार ६५० डोस, तर प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर कोविशिल्ड लसीचे ४७ हजार, तर कोव्हॅक्सिन लसीचे १२ हजार ८४० डोस उपलब्ध असल्याची माहिती भुसारे यांनी यावेळी दिली.
---------------