शिवसेनेचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:26 IST2021-01-15T04:26:02+5:302021-01-15T04:26:02+5:30
: राज्यमंत्री अब्दुल सत्तार जालना : राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार अत्यंत चांगले ...

शिवसेनेचा मेळावा
: राज्यमंत्री अब्दुल सत्तार
जालना : राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार अत्यंत चांगले काम करत असून, याचा धसका विरोधकांनी घेतला असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नमूद केले. आगामी सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना आघाडीवर राहील या दृष्टीने प्रयत्न करून, शिवसैनिकांनी सज्ज राहण्याचे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
मंगळवारी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शिवसेना-युवासेना कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, माजी आ. संतोष सांबरे, युवासेनेचे राज्यविस्तारक अभिमन्यू खोतकर, जिल्हा युवा अधिकारी भाऊसाहेब घुगे, माजी जिल्हाप्रमुख बाबासाहेब इंगळे, भाऊसाहेब पाऊलबुद्ध, पंडित भुतेकर, शहरप्रमुख विष्णू पाचपुले, दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अॅड. भास्कर मगरे, आत्मानंद भक्त, महिला आघाडीच्या संघटक सविता किवंडे, आदींची उपस्थिती होती.
यावेळी सत्तार यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंवरही त्यांच्या खास शैलीत टीका केली. आता पुढील सर्व निवडणुकांसाठी शिवसैनिक, युवा सैनिकांनी सज्ज होऊन सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या
ताब्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.
यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले की, जालना जिल्हा आणि शहर हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. आता तर आपल्याच पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसैनिकांनी जनतेत जाऊत त्यांचा प्रचार व प्रसार करणे गरजेचे आहे.
तसेच यावेळी ज्योती ठाकरे यांनीदेखील सविस्तर विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी शहरप्रमुख बाला परदेशी यांनी केले. कार्यक्रमास शिवसैनिकांची माेठी उपस्थिती होती.
चौकट
पंतप्रधानही मोराला दाणेच टाकत होते : अंबेकर
शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना जिल्हा प्रमुख भास्कर अंबकेर यांनी सांगितले की, तत्कालीन सरकारने जी कर्जमाफी दिली होती, ती फसवी होती. दीड लाख रुपये मिळावे म्हणून शेतकऱ्यांना बँकांमध्ये खेटे घालावे लागले. तसेच अनेक कागदपत्रांची पूर्तता करताना नाकीनऊ येत होते. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी कर्जमाफी दिली आहे, ती सरसकट असून, दोन लाख रुपये तातडीने माफ झाले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर ते घरात बसून असल्याचा आरोप भाजपकडून केला जात होता; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील कोरोना काळात घराबाहेर पडले नाहीत. त्यांनी मोराला दाणे टाकण्यात धन्यता मानल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांनी करून भाजपवर निशाणा साधला.