जालना : कोरोनामुळे शाळा बंद झाल्या आणि मुले घरात कोंडली गेली. त्यात मैदानी खेळावरही निर्बंध आल्याने शहरी भागातील मुलांचे वजन वाढू लागल्याच्या तक्रारी आहेत.
सकस आहार न मिळणे, प्रकृती खराब असणे आदी कारणांमुळे ग्रामीण भागातील लहान बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण आढळून येते. तर शहरी भागातील मुलांमध्ये आता लठ्ठपणाचा आजार समोर येत आहे. कोरोना महामारीचा सर्वसामान्यांसह मुलांनाही मोठा फटका बसला आहे. शाळा बंद असल्याने मुलांना ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे मुले मोबाइलमध्ये व्यस्त झाली आहेत. मैदानी खेळ बंद पडल्याने अधिक वेळ टीव्हीसमोर जात आहे. अशा एक ना अनेक कारणांनी सध्या शहरी भागातील मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण दिसत आहे.
शहरांत स्थूलता ही नवी समस्या
कोरोनापूर्वी मुले शाळेत येण्या-जाण्यासह मैदानावर अधिक प्रमाणात जात होती. अनेक मुले विविध क्रीडा प्रकाराच्या विशेष सरावासाठी जात होती. त्यामुळे त्यांचे वजन नियंत्रणामध्ये राहत होते; परंतु कोरोनामुळे मुले घरात कोंडली गेली आणि लहान मुलांच्या स्थूलतेची नवी समस्या पालकांसमोर उभी राहिली आहे.
कारणे काय?
शाळा बंद असल्याने मुलांचा अधिकचा वेळ टीव्ही आणि मोबाइलमध्येच जात आहे. मैदानी खेळ पूर्णत: बंद पडले आहेत.
अनेक मुले गोड पदार्थांच्या सेवनासह जंकफूड खाण्यावर अधिकचा भर देतात. त्यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढू लागला आहे.
अनेक मुले दैनंदिन जेवणामध्ये विविध पालेभाज्या खाण्यासही नकार देतात. त्यात तुपासह, तेलकट पदार्थ खाण्यावर भर दिला जात आहे.
तज्ज्ञ काय म्हणतात?
कोरोनामुळे मुले घरामध्ये अडकून पडली आहेत. त्यात विविध खाद्यपदार्थ खाण्यावर अनेकांचा भर असतो. मुलांनी जंकफूड टाळण्यासह तूप, तेलकट पदार्थ कमी करावेत. दररोज काही वेळ मैदानावर खेळ खेळावेत.
- डॉ. पीयूश होलानी
जंकफूडमुळे मुलांच्या भूक लागण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे त्यांनी जंकफूड टाळावेत. हिरव्या पालेभाज्यांसह सकस आहार द्यावा. वयाच्या सहा वर्षांनंतर दुधाचे प्रमाण कमी करावे. पालकांनी मुलांना टीव्हीसमोर बसू देण्याऐवजी दिवसातून काही काळ मैदानावर विविध खेळू द्यावेत.
- डॉ. सच्चिदानंद तौर
पालकांचीही चिंता वाढली
कोरोनामुळे मुलांना घराबाहेर पाठविण्याची चिंता असते. त्यात काही वेळा मुले हट्ट करून बाहेरचे खाद्यपदार्थ मागतात. त्यात आता मुलांच्या लठ्ठपणाचा विषय समोर येत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे.
- भारत रासणे
कोरोनामुळे शाळा बंद आहेत. कोरोनापूर्वी मुले शाळेत जात होती. मैदानावर खेळत होती; परंतु हे सर्व बंद झाले असून, मुले मोबाइल-टीव्ही पुढे अडकली आहेत. त्यामुळे मुलांच्या वजन वाढीच्या तक्रारी आहेत.
- ज्ञानेश्वर छल्लारे