टेंभुर्णी ग्रामपंचायतीत पुन्हा महिलाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:43 IST2021-01-08T05:43:01+5:302021-01-08T05:43:01+5:30
टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या टेंभुर्णी ग्रामपंचायतीत यावर्षी तब्बल १० महिला निवडून येणार आहेत. त्यामुळे पुन्हा ...

टेंभुर्णी ग्रामपंचायतीत पुन्हा महिलाराज
टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या टेंभुर्णी ग्रामपंचायतीत यावर्षी तब्बल १० महिला निवडून येणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामपंचायतींवर महिलाराज येणार आहे.
मावळत्या ग्रामपंचायतीत १७ सदस्यांत ९ महिला सदस्या होत्या. या निवडणुकीत १० जागेवर महिला सदस्य निवडून येणार असल्याने पुन्हा एकदा ग्रामपंचायतींमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचीच चलती राहणार आहे. एरवी ग्रामपंचायतीत पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव असल्या तरी टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या १७ जागांपैकी केवळ ७ जागांवर पुरुष सदस्य निवडून येणार आहेत. यावर्षी येथील ६ प्रभागांपैकी चार प्रभागांमध्ये प्रत्येकी २ महिला सदस्या निवडून येणार आहेत, तर प्रभाग १ व ५ मध्ये प्रत्येकी १ महिला निवडून येणार असल्याने नव्या ग्रामपंचायतीच्या फलकावर १० महिला सदस्यांची वर्णी लागणार आहे. एरवी कुठल्याही ग्रामपंचायतीत महिलांचे बहुमत असले तरी सत्तेच्या चाव्या सदैव पुरुषांच्या हाती राहत असल्याने आता या निवडणुकीत पुरुष सदस्य काय खेळी खेळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रभाग ५ मध्ये सर्वसाधारण जागेवरही महिलाच
निवडणुकीपूर्वी जाहीर झालेल्या सरपंचपदाच्या आरक्षणात टेंभुर्णीचे सरपंचपद मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित झाले होते. यापुढेही हेच आरक्षण कायम राहील, या आशेवर मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित प्रभाग ५ मधील सर्वसाधारण जागेवर एकही मागासवर्गीय पुरुष उमेदवार निवडणूक लढवीत नसल्याने या प्रभागातूनही महिला सदस्यच निवडून येणार आहेत.