Lots of people flocked to pay homage to the martyr Ganesh Gawande | शहीद जवान गणेश गावंडे यांना श्रद्धांजली देण्यासाठी लोटला जनसागर

शहीद जवान गणेश गावंडे यांना श्रद्धांजली देण्यासाठी लोटला जनसागर

ठळक मुद्देश्रीनगर, राजस्थान, दिल्ली, पुणे येथे पोस्टिंग सेवा बजावत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने निधन

भोकरदन : शहीद जवान गणेश संतोषराव गावंडे यांच्यावर बुधवारी ( दि. २३ ) सकाळी १० वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद गणेश गावंडे यांना श्रद्धांजली देण्यासाठी तालुक्यातून  भिवपुर येथे मोठा जनसागर लोटला होता.  

बेळगाव येथे ट्रेनिंगनंतर जवान गणेश गावंडे यांनी पंधरा वर्षे मराठा बटालियन इन्फंट्रीमध्ये देश सेवा केली. या दरम्यान, श्रीनगर, राजस्थान, दिल्ली, पुणे येथे पोस्टिंग होती. पुणे येथेच सोमवारी ( दि. २१ ) सेवा बजावत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने निधन झाले होते. बुधवारी सकाळी मूळ गावी भिवपुर येथे त्यांचे पार्थिव आणण्यात आले. यावेळी गावातील प्रत्येक घरासमोर रांगोळ्या काढून फुलांचा सडा टाकून त्यांना अभिवादन केले.

गावातून हजारो नागरिकांसोबत अंत्ययात्रा त्यांच्या शेतात पोहोचली. नायब सुभेदार विजय हवालदार, प्रकाश काळे, विलास नाईक, गीलानी शेख, माजी सैनिक संघटनेचे हवालदार विठ्ठल जगताप,बाळू तायडे यांनी मानवंदना दिली. पोलिस प्रशासनाने बंदुकीतून हवेत फैरी झाडून सलामी दिली. आई कमला, पत्नी पुष्पा, मुले कार्तिक व यश यांनी त्यांना वंदन करताच उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटून भावपूर्ण वातावरण झाले.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, उपविभागीय अधिकारी अंजली कानडे, पोलिस निरीक्षक चत्ररभुज काकडे, नायब तहसिलदार के टी तांगडे,  हभप संतोष महाराज आढावणे, हभप अजबराव महाराज मिरगे, प्रादेशिक सेना व सैनिक संघटनेचे विठ्ठल जगताप, जिल्हा परिषद सदस्य आशाताई पांडे, किशोर गावंडे, सरपंच रतन गावंडे, मंडळ अधिकारी पी.जी. काळे, एस. टी. गारोळे, तलाटी अभय कुलकर्णी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

Web Title: Lots of people flocked to pay homage to the martyr Ganesh Gawande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.