ट्रक चालकाला लुटणारे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 01:14 IST2019-12-03T01:13:40+5:302019-12-03T01:14:03+5:30
पोलीस असल्याची बतावणी करून एका ट्रक चालकाला लुटणाऱ्या दोघांना चंदनझिरा पोलिसांनी जेरबंद केले.

ट्रक चालकाला लुटणारे जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पोलीस असल्याची बतावणी करून एका ट्रक चालकाला लुटणाऱ्या दोघांना चंदनझिरा पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई शहरातील संजयनगर भागात करण्यात आली. ही घटना रविवारी सकाळी शहरातील औरंगाबाद चौफुली येथे घडली होती. यावेळी पोलिसांनी १ लाख ३८ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
नाशिक येथील पाथर्डी फाटा येथील रहिवासी असलेला चालक राजेंद्र भालेराव हे रविवारी सकाळी औरंगाबाद चौफुली येथे आला होता. त्यावेळी रिक्षातून आलेल्या दोघांनी त्याचे वाहन अडविले. पोलीस असल्याची बतावणी करून भालेराव यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम व एटीएम घेऊन गेले होते. घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी संजयनगर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी कारवाई करून एका रिक्षात (क्र. एम. एच. २१. बी. जी. ०३३४) मध्ये बसलेले शेख मोहमद शेख समशेर (रा.संजयनगर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर सदरील गुन्हा त्याचा सहकारी शेख रूखमान शेख गफार (रा. लाधीमोहल्ला काद्राबाद, जालना) याच्यासमवेत केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील १८ हजाराचा मोबाईल, रोख रक्कम, एटीएम कार्ड, रिक्षा असा एकूण १ लाख ३८ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि शामसुंदर कौठाळे, सपोनि आर. एस. सिरसाठ, पोउपनि प्रमोद बोंडले, सपोउपनि कांबळे, अनिल काळे, नंदलाल ठाकूर , नंदकुमार दांडगे यांच्या पथकाने केली.