१ जूनपर्यंत वाढवली टाळेबंदी: जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:28 IST2021-05-17T04:28:46+5:302021-05-17T04:28:46+5:30
जालना : कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने, आपत्कालीन उपाययोजनेचा भाग म्हणून ‘ब्रेक द चेन’अंतर्गत टाळेबंदीचा कालावधी येत्या १ ...

१ जूनपर्यंत वाढवली टाळेबंदी: जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
जालना : कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने, आपत्कालीन उपाययोजनेचा भाग म्हणून ‘ब्रेक द चेन’अंतर्गत टाळेबंदीचा कालावधी येत्या १ जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे, तसेच यापूर्वीच्या आदेशान्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांसह आणखी काही अतिरिक्त निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
जिल्हा दंडाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी शुक्रवारी हे आदेश काढले. या आदेशानुसार कोणत्याही वाहनाने महाराष्ट्र राज्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींनी निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणी अहवाल बाळगणे आवश्यक आहे. हा अहवाल राज्यातील प्रवेशाच्या ४८ तासांपूर्वीचा असावा. संवेदनशील ठिकाणाहून येणाऱ्या व्यक्ती मग त्या देशातील कोणत्याही प्रदेशातील असो, त्यांना यापूर्वीच्या १८ एप्रिल व १ मेमधील आदेशातील सर्व प्रतिबंध लागू राहतील. कार्गो वाहतुकीत एक चालक व सफाईगार अशा दोनच व्यक्तींनाच परवानगी असेल. जर कार्गो वाहतूक ही राज्याबाहेरील असेल, तर त्या वाहनातील कर्मचारी यांनी निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणी अहवाल बाळगणे आवश्यक आहे. हा अहवाल राज्यातील प्रवेशाच्या ४८ तासांपूर्वीचा असावा व तो ७ दिवसांकरिता वैध राहील.
स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ग्रामीण बाजार एपीएमसीवर विशेष लक्ष ठेवावे आणि त्या ठिकाणी कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने विशेष निगराणी ठेवावी. जर अशा ठिकाणी संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने अडथळा येत असेल, असे निदर्शनास आल्यास, ती ठिकाणे बंद करण्याबाबत किंवा बंधने कडक करण्याबाबत निर्णय घ्यावा. दूध संकलन, वाहतूक, प्रक्रिया निर्बंधाशिवाय चालू राहील, परंतु अत्यावश्यक वस्तूंचे व्यवहार किंवा घरपोच वितरणाद्वारे दुकानावर लावलेल्या निर्बंधाच्या अधीन राहून किरकोळ विक्रीस परवानगी राहील.