भोकरदन (जालना) : शेतातील कामे आटोपून घराकडे जात असताना अंगावर विज कोसळून दोघे जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला असल्याची घटना भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई शिवारात सोमवारी दुपारी घडली आहे. गणेश प्रकाश जाधव (३५) आणि सचिन विलास बावस्कर (२८) अशी मृतांची नावे असून दोघेही कोठाकोळी येथील रहिवासी आहेत. तर जखमी प्रंशात रमेश सोनवणे याला पुढील उपचारासाठी सिल्लोड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घरची परिस्थिती जेमतेम असल्याने कोठाकोळी येथील गणेश प्रकाश जाधव (३५), सचिन विलास बावस्कर (२८) आणि प्रंशात रमेश सोनवणे हे तीन होतकरू तरुण मिळेल ते काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यामुळे सोमवारी सकाळी कामानिमित्त पिंपळगाव रेणुकाई येथे आले होते. काम आटोपून तिघेही घराकडे निघाले. यातच दुपारी वीजेच्या कडकडाटासह रिमझीम पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे या तिंघानी रस्त्यावरील झाडाचा आसरा घेतला. माञ अचानक झाडावर विज कोसळून गणेश जाधव व सचिन बावस्कर या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रंशात सोनुने हा गंभीर जखमी झाला. गणेश जाधव हा विवाहीत असून त्याच्या पश्चात आई,वडील,पत्नी, मुलगा,मुलगी असा परिवार आहे. तर सचिन बावस्कर याच्या पश्चात आई, दोन भाऊ असा परिवार आहे.
गावात चूल पेटली नाहीगणेश व सचिन हे दोन्ही तरुण गावात कोणतेही काम असो ते सर्वांच्या सुखा-दुःखात उभे असायचे शिवाय कोणीही काम सांगितले तर ते काम तत्काळ करायचे. शिवाय गावात सर्वांशी आदराने व प्रेमाने वागायचे यांच्या मृत्यूची वार्ता गावात पसरताच ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतली. गावात कोणाच्याही घरी चूल पेटली नाही.
सलग दुसऱ्या दिवशी वीज कोसळून मृत्यू जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान पसरले आहे. रविवारी दुपारी जिल्ह्यातील विविध गावांना अवकाळी पावसाने झोडपले. यावेळी वादळी वाऱ्यासह वीज पडून भोकरदन तालुक्यात दाेघांचा वीज पडून मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले होते. तर आज पुन्हा वीज कोसळून भोकरदन तालुक्यातच दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.