...तर आघाडीच्या अडचणी वाढणार!
By Admin | Updated: November 17, 2016 00:48 IST2016-11-17T00:38:36+5:302016-11-17T00:48:26+5:30
जालना गत पाच वर्षे जालना नगर पालिकेत सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसाठी ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता मावळली

...तर आघाडीच्या अडचणी वाढणार!
राजेश भिसे जालना
गत पाच वर्षे जालना नगर पालिकेत सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसाठी ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता मावळली असून, नगराध्यक्ष पदाच्या युती पुरस्कृत उमेदवार शकुंतला कदम यांनी राजकीय आयुधे वापरण्यास सुरुवात केल्याने आघाडीच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. तसेच घनकचरा प्रकल्प, फुले मार्केटचे पुनर्निर्माण, अंतर्गत जलवाहिनी अंथरण्याचे काम आदी रखडलेल्या कामांमुळे आघाडीला ही निवडणूक सोपी राहिली नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
गत काही दिवसांपासून जालना नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते अर्ज मागे घेण्यापर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून संगीता गोरंट्याल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. मात्र, युतीने अपक्ष उमेदवार शकुंतला कदम यांना पुरस्कृत केले.
दरम्यान, तुल्यबळ लढतीची शक्यता दिसत नसल्याने आघाडीच्या नेत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र, राजकारणात कधीही काहीही कायमस्वरुपी नसते. याचा आघाडीच्या नेत्यांना विसर पडला. गत २० ते २५ वर्षांपासून राजकारणात सक्रिय असलेल्या शकुंतला कदम यांनीही आपला अनुभव पणाला लावत राजकीय आयुधे वापरण्यास सुरुवात केली आहे. गत पाच वर्षांत शहराची बकाल अवस्था झाली असून, मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना झगडावे लागत असल्याचे चित्र असून, कदम यांचा निवडणूक प्रचारात याच मुद्द्यांवर भर राहणार असल्याचे दिसून येते आहे.
शहरातील पथदिवे अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. घनकचरा प्रकल्प या ना त्या कारणांमुळे रखडला आहे. स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आहे. मुख्य म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महात्मा फुले मार्केटचे पुनर्निर्माण रखडल्याने व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिकांत असंतोष आहे. तर दुसरीकडे शहराच्या सौंदर्यात भर पडण्याऐवजी ते बकाल झाले आहे. एकूणच रखडलेल्या विविध प्रकल्पांमुळे मतदारांमध्ये रोष असल्याने ही निवडणूक आघाडीसाठी सोपी नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. असे असले तरी शिवसेना-भाजपा युतीचा अधिकृत उमेदवार नसल्याने निश्चिंत झालेल्या आघाडीच्या नेत्यांना यावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.