लाडाची लेक सीमेवर लढणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:33 IST2021-08-22T04:33:00+5:302021-08-22T04:33:00+5:30
एनडीए परीक्षेसाठी मुलींना संधी नाकारली जात होती. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीनंतर ...

लाडाची लेक सीमेवर लढणार !
एनडीए परीक्षेसाठी मुलींना संधी नाकारली जात होती. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने एनडीएची परीक्षा मुलींना देण्याची संधी देण्याबाबत निकाल दिला. न्यायालयाच्या निकालामुळे देशसेवेसाठी एनडीएमार्फत भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलींचा मार्ग मोकळा झाला आहे.
काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल?
एनडीएच्या परीक्षेत मुलींना बसता येणार नाही या शासनाच्या निर्णयावर न्यायालयाने तारेशे ओढले आहेत. हा निर्णय लिंगभेदावर आधारित असल्याचे सांगण्यात आले.
यावर केंद्र शासनाने तत्काळ तोडगा काढावा, असे सांगताना स्त्रियांना लष्करात वारंवार संधी देण्याबाबत कोर्टाला वारंवार हस्तक्षेप करण्यास लावू नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या व एनसीसीच्या मुलींनी स्वागत केले आहे.
लष्करात प्रवेशासाठी...
लष्करात प्रवेश मिळविण्यासाठी एनडीए, आयएमए आणि ओटीए या तीन माध्यमांद्वारे प्रवेश मिळविता येतो. त्यासाठी मुला-मुलींना आता शारीरिक आणि परीक्षेचीही अधिक तयारी करावी लागते. अनेकजण या परीक्षेसाठी मोठ्या शहरातही जातात.
शहरात एनसीसीच्या २०० मुली
शहरातील काही महाविद्यालयांमध्ये एनसीसीचा विभाग चालविला जातो. या एनसीसीच्या विभागात जवळपास दीडशे ते दोनशे मुली आहेत. या मुली उत्स्फूर्तपणे एनसीसीच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होताना दिसतात.
लेकींनी मानले न्यायालयाचे आभार !
न्यायालयाच्या निकालामुळे मुलींना मोठा दिलासा मिळाला आहे. एनडीए परीक्षेत यश मिळविणाऱ्या मुलींना अधिकारी होऊन देशसेवा करता येणार आहे.
- तेजस्विनी गजानन वाळके
यापूर्वी मुलींना एनडीएची परीक्षा देता येत नव्हती. त्यात आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे मुलींना ही परीक्षा देता येणार आहे.
- गार्गी संभाजी गिरी
अनेक मुली एनडीएची परीक्षा देण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. या निकालामुळे अनेक मुली आता एनडीएकडे वळणार आहेत.
- निर्मला परशराम खेरीया