परतूर रेल्वे स्थानकात सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:42 IST2021-01-08T05:42:30+5:302021-01-08T05:42:30+5:30
फोटो परतूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने येथील रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे; मात्र रेल्वे स्थानकात ...

परतूर रेल्वे स्थानकात सुविधांचा अभाव
फोटो
परतूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने येथील रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे; मात्र रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना असुविधांमुळे गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे येथे बसण्यासाठी बेंचही नाहीत, त्यामुळे अनेकांना उभे राहूनच रेल्वेची प्रतीक्षा करावी लागत आहे.
कोरोनामुळे रेल्वे वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली होती. त्यामुळे रेल्वे व बसस्थानक ओस पडले होते. या ठिकाणी कॅन्टीन नसल्याने व्यावसायिकांची गैरसोय झाली. तर प्रवाशांना त्रास देणारी मोकाट जनावरेही गायब झाली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आणि रेल्वे सेवाही पूर्ववत होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. येथील रेल्वे स्थानकात सध्या प्रवाशांची गर्दी होत आहे; मात्र येथे सुविधांचा अभाव दिसून येत आहे. लॉकडाऊनच्या काळात स्थानकाची डागडुजी करण्यात आली. प्लॅटफार्मसह बाहेरील पार्किंगचे डांबरीकरण करून कठडेही उभारण्यात आले आहेत. हे करताना प्लॅटफार्मवरील प्रवाशांना बसण्यासाठी काढण्यात आलेले लोखंडी बेंच अद्याप बसवण्यात आले नाहीत. हे काढलेले बेंच एका ठिकाणी भंगारसारखे धूळ खात आहेत. या ठिकाणी पाण्याचा अभाव आहे. स्थानक धुळीने माखले आहे. एकूणच स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढत असली तरी, सुविधांचा मात्र अभाव जाणवत आहे. तरी रेल्वे प्रवाशांना आता सुविधाही पुरवाव्यात, अशी मागणी होत आहे.
चौकट
डब्बे मागे-पुढे प्रवाशांचा गोंधळ
येथील रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी ८ वाजता मराठवाडा एक्स्प्रेस येत होती. त्यावेळी स्थानकातील स्क्रीनवर डबा क्रमांक देण्यात आला; मात्र तो अचानक बदलण्यात आला. त्यामुळे प्रवासी आपला डबा गाठण्यासाठी मागचे पुढे व पुढचे मागे गेले; परंतु हा स्क्रीन पुन्हा जशास तसा करण्यात आला. यामुळे गाडी स्थानकात आली असता, प्रवाशांची एकच धावपळ झाली. स्क्रीनच्या बदलाबदलीमुळे महिला प्रवाशांसह इतरांना मनस्ताप सहन करावा लागला.