कृषी विज्ञान केंद्रास सर्वोत्कृष्ट 'निक्रा केव्हीके' पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 17:47 IST2019-06-05T17:47:58+5:302019-06-05T17:47:58+5:30

निक्रा म्हणजे राष्ट्रीय हवामान अनुकूल शेती नवकल्पना प्रकल्प

Krishi Vigyan Kendra bagged the best 'NICRA KVK' award | कृषी विज्ञान केंद्रास सर्वोत्कृष्ट 'निक्रा केव्हीके' पुरस्काराने सन्मानित

कृषी विज्ञान केंद्रास सर्वोत्कृष्ट 'निक्रा केव्हीके' पुरस्काराने सन्मानित

रामनगर (जालना ) : जालना तालुक्यातील खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रास ‘सर्वोत्कृष्ट निक्रा केव्हीके-२०१९’ या पुरस्काराने मंगळवारी हैद्राबाद येथे सन्मानित करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांनी हा पुरस्कार स्विकारला. 

भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहानिदेशक कृषी विस्तार डॉ. ए. के. सिंग यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  यावेळी सहाय्यक महानिदेशक नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन डॉ. एस. भास्कर, हैद्राबाद केंद्रीय कोरडवाहू संशोधन संस्थेचे संचालक डॉ. जी. रविंद्र चारी, डॉ. एम. प्रभाकर, डॉ. जे. व्ही. एन. एस. प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

निक्रा म्हणजे राष्ट्रीय हवामान अनुकूल शेती नवकल्पना प्रकल्प देशातील १२१ हवामान संवेदनशील जिल्ह्यात २०११ पासून कृषी  विज्ञान केंद्रामार्फत राबविला जात आहे. या कृषी विज्ञान केंद्रांची वार्षिक आढावा कार्यशाळा हैद्राबाद येथे ४ ते ६ जून या कालावधीत होत आहे. या कार्यशाळेचे औचत्य साधून हे पुरस्कार देण्यात आले.

बदलत्या हवामान परिस्थितीशी लढा देण्यासाठी कृषि विज्ञान केंद्राने काय प्रयत्न केलेत व कोणते हवामान अनुकूल तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले, त्याचा किती शेतकऱ्यांना कशा प्रकारे फायदा झाला या निकषावर आधारीत प्रत्येक झोनमधून दोन केव्हीकेंना हे पुरस्कार देण्यात आले. 

देशात एकूण ११ झोन आहेत. केव्हीके जालना हे हा पुरस्कार मिळणारे महाराष्ट्रातील एकमेव केव्हीके आहे. बदनापूर तालुक्यातील कडेगाव आणि वरुडी या गावात कृषि विज्ञान केंद्राने रेशीम उद्योग, शेळीपालन, कुक्कुटपालन, शेततळे, हवामान अनुकूल वाणांचा प्रसार, भाडेतत्वावर अवजारे बँक, कापूस पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन, शेंदरी बोंडअळीचे नियंत्रण, विहीर पुनर्भरण तंत्रज्ञान, मोसंबीच्या बागा वाचविण्यासाठी केलेले प्रयत्न या बाबींची नोंद घेण्यात आली. या कामासाठी कृषि विभाग, रेशीम विभाग व इतर तत्सम विभागांचेही सहकार्य मिळाले. प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

Web Title: Krishi Vigyan Kendra bagged the best 'NICRA KVK' award