कोविड - १९ लसीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:41 IST2021-01-08T05:41:32+5:302021-01-08T05:41:32+5:30

जालना : कोविड -१९ वरील लस लवकरच उपलब्ध होणार असून, पहिल्या टप्प्यामध्ये ही लस आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना ...

Kovid - 19 District Collector held a meeting for vaccination | कोविड - १९ लसीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक

कोविड - १९ लसीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक

जालना : कोविड -१९ वरील लस लवकरच उपलब्ध होणार असून, पहिल्या टप्प्यामध्ये ही लस आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणार आहे. जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने ही लस प्रत्येक व्यक्तीपर्यंत सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी तालुकानिहाय बैठक जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या अध्यक्षेतखाली सोमवारी घेण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष कडले, डॉ. सोनटक्के आदींची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी बिनवडे म्हणाले, कोविड -१९ वरील लस लवकरच उपलब्ध होणार असून, ड्रायरनसाठी महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये जालना जिल्ह्यात २ जानेवारी रोजी पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत ड्रायरन घेण्यात आला. यामुळे लसीकरणावेळी येणाऱ्या अडचणींवर कशा प्रकारे मात करावी याबाबत शहानिशा झाली. लसीकरणावेळी प्रत्यक्षरीत्या कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाहीत, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. लसीकरणासाठी प्रत्येक टीममध्ये सहा जणांचा समावेश असणार असून, यामध्ये एक शिक्षक, एका आशा कार्यकर्ती, एक पोलीस कर्मचारी, दोन परिचारिका आणि एक अंगणवाडी सेविका यांचा समावेश राहणार आहे. यासाठी तीन कक्षांची आवश्यकता पडणार आहे. पहिल्या कक्षात लसीकरणासाठी येणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवली जाईल तर दुसऱ्या कक्षात त्या व्यक्तीला लस टोचण्यात येईल. तिसऱ्या कक्षामध्ये लस दिलेल्या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. कोविड-१९ वरील लसीची थंड जागेमध्ये साठवणूक करणे गरजेचे असल्याने पुरेशा प्रमाणामध्ये कोल्ड स्टोरेजची माहिती उपलब्ध करून ठेवावी. कोविड लसीवरील देखरेख व तयारीसाठी शासनामार्फत कोविन नावाचे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून, या सॉफ्टवेअरच्या वापराबद्दल अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी बिनवडे यांनी यावेळी दिले.

हे लसीकरण यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रत्येकाने एकसंघ तसेच समन्वयाने काम करण्याची गरज असून, कोरोनाच्या काळात प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याने उत्कृष्ट काम केले आहे. लसीकरणाच्या कामातसुद्धा सर्वजण नियोजनबद्ध व उत्कृष्ट काम करून लसीकरणाचा कार्यक्रम यशस्वी करतील, असा विश्वासही जिल्हाधिकारी बिनवडे यांनी यावेळी व्यक्त केला. या बैठकीस सर्व उपविभागीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: Kovid - 19 District Collector held a meeting for vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.